नोंदणी करताना घ्या काळजी

By Admin | Published: June 9, 2016 02:04 AM2016-06-09T02:04:45+5:302016-06-09T02:04:45+5:30

पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात ‘आॅनलाइन प्रवेश प्रक्रिये’बाबत अनेक प्रश्न आहेत.

Take care while registering | नोंदणी करताना घ्या काळजी

नोंदणी करताना घ्या काळजी

googlenewsNext


पिंपरी : पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात ‘आॅनलाइन प्रवेश प्रक्रिये’बाबत अनेक प्रश्न आहेत. आॅनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जयहिंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य कैलास सोनवणे यांनी काही मुद्दे सांगितले.
सोनवणे म्हणाले, ‘‘ अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका दिली आहे. त्यामध्ये आॅनलाइन प्रक्रियेची इत्थंभूत माहिती असून, विद्यार्थी आणि पालकांनी पुस्तिकेतून एक-एक भाग समजून घ्यावा. बदललेली प्रवेश प्रक्रिया पाल्याला घरबसल्या प्रवेश मिळवून देण्यास मदत करणारी आहे. त्यामुळे भांबावून न जाता पालकांनी आॅनलाइन नोंदणीत पाल्याची मदत करावी. आॅनलाइन प्रवेशासाठी ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म भरला जातो. त्यातील ‘ए’ फॉर्म हा शाळेकडून आधीच भरला गेला असून, आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बी फॉर्म भरणे आवश्यक आहे. तो भरण्याआधी मार्गदर्शन पुस्तिकेत मिळालेला यूआयडी कोड नोंदवणे आवश्यक आहे. त्यासोबतच दिलेला पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
दहावीचा निकाल ‘अंतिम’ नाही
‘इयत्ता दहावी’ या दोन शब्दांनीच विद्यार्थ्यांंचे आयुष्य वर्षभरासाठी व्यापून गेलेले असते. अभ्यास, परीक्षा यासाठी वर्षभर पालक आणि विद्यार्थी मेहनत घेत असतात. या अथक परिश्रमांचे ध्येय ठरलेले असते. पण, या ध्येयाकडे जाण्यासाठी दहावीचे गुण एकच रस्ता असल्याचे मानले जाते. मात्र, दहावीला किती गुण मिळाले, यावर भवितव्य अवलंबून नसते, हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. निकालानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. दहावीत मनासारखे गुण न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांंना आणि पालकांनाही नैराश्य येते. विद्यार्थ्यांना परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सतत मनावर बिंबवलेले असते. त्यामुळे निकालानंतर त्यांना धक्का बसतो. पण, अशा वेळी पालकांनी मुलांना धीर दिला पाहिजे.
पालकांनीच मुलांचे मानसिक खच्चीकरण केले, सतत त्यांना दोष दिला, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे पालकांनी ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली पाहिजे. पालकांनी संयमिपणे वागले पाहिजे, असे काही मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. दहावीत मिळालेल्या गुणांवर भवितव्य अवलंबून नसते. ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी तो एक मार्ग असतो. कमी गुण मिळाल्याने त्या ध्येयाकडे वाटचाल करता येणे शक्य नसेल, तर दुसरा पर्याय शोधला पाहिजे. याच वयात मुलांना ही शिकवण मिळणे आवश्यक आहे. ते ध्येय गाठता आले नाही, तरी खचून जाता कामा नये, हे पालकांनी पाल्यांना शिकवले पाहिजे. कारण, परीक्षेच्या गुणांपेक्षाही पुढे आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी मुलांना आत्ताच तयार केले पाहिजे. पाल्याची क्षमता समजून घेऊन त्याला अनुरूप असे शिक्षण दिले पाहिजे. (प्रतिनिधी)
>‘कोट्यातून’ प्रवेश घेताना
जर विद्यार्थ्यांना विशेष कोट्यातून प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठीचे आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक असते. सध्या कला, क्रीडा, जातीनिहाय आणि अपंगत्वावर विशेष जागा राखीव ठेवल्या जातात. क्रीडा कोट्यातून प्रवेश घेताना जिल्हा क्रीडा कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक असते. त्याचबरोबर कला क्षेत्रातील कामगिरीसाठी कला संचालनालय विभागाकडून प्रशस्तिपत्रक मिळवावे. जातीनिहाय प्रवेशासाठी जातीचा दाखला आवश्यक असून, तो नसल्यास विद्यार्थ्यांनी दाखला काढून घ्यावा. कारण, प्रवेशावेळी कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे.
>महाविद्यालय निवडताना
आॅनलाइन प्रवेश नोंदणीसाठी यंदा ५० महाविद्यालये निवडायची असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालये निवडताना विशेष काळजी घ्यावी. यात एमएमआरडीए, झोनल आणि वॉर्ड स्तरावर यादी भरायची आहे. एमएमआरडीए पर्यायात १५ ते ३० महाविद्यालये, झोनल स्तरावर १५ ते २० महाविद्यालये आणि वॉर्ड स्तरावर ५ ते १० महाविद्यालये निवडायची आहेत. मार्गदर्शक पुस्तिकेत गतवर्षीची ‘कट आॅफ’ यादी शाखानिहाय देण्यात आली आहे.
>कॉलेज बदल ‘एकदाच’
पहिल्या यादीत नाव जाहीर झाल्यानंतर आलेल्या पयार्यांपैकी एक तरी महाविद्यालय निवडणे अनिवार्य आहे. ते महाविद्यालय तुमच्या पसंतीचे नसेल, तर तुम्ही दुसऱ्या यादीसाठी थांबू शकता. दुसऱ्या अथवा तिसऱ्या यादीत हवे असलेले महाविद्यालय असेल, तर पहिल्या महाविद्यालयाचा प्रवेश रद्द करून नव्या यादीत लागलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. पण, महाविद्यालय बदलण्याची मुभा एकदाच देण्यात असून, ते विचारपूर्वक निवडावे.
>‘आॅफलाइन’ प्रवेश नाही
यंदा अकरावी प्रवेश आॅनलाइन पद्धतीनेच करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. आॅनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना आॅफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही, याची पालक, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
दोन शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य
विद्यार्थ्यांंना कोणत्या विद्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरत नसेल, तर त्यांना दोन शाखा निवडीचा पर्याय दिला आहे. त्यासाठी दोनदा नोंदणी करणे आवश्यक असून, निवडलेल्या शाखांचे महाविद्यालय निवडावे.
पावती महत्त्वाची
यादीतील महाविद्यालयात प्रवेश घेताना केवळ कागदपत्रांची पूर्तता केली म्हणजे प्रवेश झाला असे नाही, तर प्रवेशाची पावती मिळत नाही, तोपर्यंत प्रवेश झालेला नाही. यासाठी ५० रुपये आकारण्यात येणार आहेत.
>निकालानंतरचे दहा दिवस खूप महत्त्वाचे असतात. संवेदनशील मुलांच्या पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कमी गुण मिळाले किंवा मनासारखे गुण मिळाले नाहीत, म्हणून हे विद्यार्थी नकारात्मक विचार करू लागतात. यातून ते अयोग्य मार्गावर जाण्याचा धोका अधिक असतो. या वेळी पालकच मुलांचा आधार बनू शकतात. त्यांना सकारात्मक ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. पण, पालकांना मुलाचे वर्तन सामान्य वाटत नसेल, अथवा वर्तन सामान्य असले, तरीही मनात काही तरी चालू असल्याचे जाणवले, तर नक्कीच पालकांनी मुलांना समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांकडे नेणे आवश्यक आहे. नैराश्य आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.- मनोज देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Take care while registering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.