मकर संक्रांतीचा सण साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या: छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:25 PM2022-01-13T14:25:41+5:302022-01-13T14:26:00+5:30
पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मकर संक्रांतीच्या राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मकर संक्रांतीचा सण म्हंटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग उडवत असतात मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना तसेच मानवी जीविताला देखील धोका असल्याने नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.
संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो मात्र देशभरात कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हाथ स्वछ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले आहे.