एकत्रित निवडणुका घ्या; शिवसेनेचा आग्रह, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दाखविली तयारी
By अतुल कुलकर्णी | Published: December 5, 2018 06:22 AM2018-12-05T06:22:04+5:302018-12-05T06:22:27+5:30
भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील.
- अतुल कुलकर्णी
मुंबई : भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घ्या, असा प्रस्ताव भाजपाला दिल्याचे सेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. भाजपानेही तशी तयारी सुरू केली असल्याचे समजते. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला चुचकारण्याचे धोरण भाजपाने अवलंबिले आहे. शिवसेनेला दुखावू नका, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही सांगितलेले आहे. त्यामुळे चार वर्षे रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले, तर आ. नीलम गोºहे यांच्या उपसभापतीपदासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी भरपूर प्रयत्न केले. शिवाय, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेवर गेल्या कित्येक दिवसांत टीका केलेली नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्टÑवादीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. उद्या निवडणूक जाहीर झाली, तरी आमची तयारी आहे. केंद्र व राज्य सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. या नाराजीत वाढ होऊ नये, म्हणून भाजपा नेते घायकुतीला आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तरी आमची तयारी आहे, असे राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
‘लोकमत’ने दिले होते वृत्त
लोकसभेची मुदत मे २०१९ मध्ये, महाराष्ट्र विधानसभेची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्ये संपत आहे. त्यामुळे लोकसभेसोबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही घेतली जाऊ शकते, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हालचालींना वेग आला.