‘... तर पोलिसांविरुद्ध अवमान कारवाई करणार’
By admin | Published: May 4, 2017 04:11 AM2017-05-04T04:11:31+5:302017-05-04T04:11:31+5:30
ध्वनीप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दोन पोलिसांना इशारा देऊन सोडण्यात आल्याने
मुंबई: ध्वनीप्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दोन पोलिसांना इशारा देऊन सोडण्यात आल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या दोन पोलिसांवर गंभीरपणे अवमान कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च न्यायालयाने सरकारला दिला.
दर्गा उरुसच्या वेळी माहिम पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी दिल्याने गेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन पोलिसांना नोटीस बजावली. बुधवारच्या या दोन्ही पोलिसांविरुद्ध काय कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला? अशी विचारणा न्यायाीलयाने केली. त्यावर सरकारी वकील गीता शास्त्री यांनी या दोन्ही पोलिसांना पोलीस आयुक्तांनी इशारा दिल्याचे न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाला सांगितले.
‘जर राज्य सरकार हे इतक सहज घेत असेल तर आम्ही या दोघांवर गंभीरपणे कारवाई करू. सरकारनेच ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर दरवर्षी पोलीस याची पुनरावृत्ती करतील,’ असे खंडपीठाने म्हटले.
‘पोलीस ठाणे ‘शांतता क्षेत्रात’ मोडतात. आमच्या आधीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ९ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)