आयटीआयच्या जागेचा ताबा घ्या

By admin | Published: January 17, 2017 01:33 AM2017-01-17T01:33:09+5:302017-01-17T01:33:09+5:30

झालेले अतिक्रमण संस्थेचे प्राचार्य आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले.

Take control of ITI space | आयटीआयच्या जागेचा ताबा घ्या

आयटीआयच्या जागेचा ताबा घ्या

Next


वाघोली : जिल्हाधिकाऱ्यांनी हवेली तालुका आयटीआयसाठी वाघोली येथे दिलेल्या ३ एकर जागेचा ताबा घेण्याबरोबरच त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण संस्थेचे प्राचार्य आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. महसूल विभागाने याबाबत दखल घेतल्याने आयटीआयच्या जागेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
तालुकास्तरावर विद्यार्थ्यांना आयटीआयचे प्रशिक्षण मिळावे, या हेतूने हवेली तालुक्याकरिता असणारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) २००८ पासून पेरणे फाटा येथे सुरू आहे. सदरचे आयटीआय शासनाचा घटक असला तरी गेल्या ८ वर्षांपासून खासगी जागेमध्ये चालू आहे. महिन्यापोटी शासनाकडून जागामालकाला भाडे दिले जात आहे. वाघोली येथे महामार्गालगत शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या संस्थेला २०१३ मध्ये गट क्रमांक १४१३ मधील ३ एकर जागेचा ताबा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. यानंतर या जागेची मोजणी करीत असताना अडचणी आल्यामुळे संस्थेने संबंधित यंत्रणांना कळविले होते.
परंतु जागेचा ताबा देण्यासंदर्भात प्रशासन गेली तीन वर्षे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वाघोली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर सातव यांनी विद्यार्थ्यांना आयटीआयचा फायदा होण्यासाठी संबंधित ३ एकर जागा हवेली तालुका आयटीआयला मिळण्याकरिता अर्ज केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाचे तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित ३ एकर जागेचा ताबा देण्याचे आदेश हवेली तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमिलेख उपअधीक्षक यांना दिले आहे.
यानुसार संस्थेचे प्राचार्य आणि संबंधित यंत्रणांना जागेच्या ताब्याची तारीख निश्चित करून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे जागेची ताबा पावती, पंचनामा आणि विलंबाचे कारण जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावे लागणार
आहे.
मागील तीन वर्षांपासून हवेली तालुका आयटीआयच्या जागेच्या अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पाऊल उचलले असल्याने जागेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (वार्ताहर)
>१ लाख ५६ हजार रुपये भाडे
सध्या पेरणे फाटा येथील खासगी जागेमध्ये कार्यरत असणाऱ्या हवेली तालुका आयटीआयकरिता शासनाला १ लाख ५६ हजार रुपये प्रतिमहिना भाडे मोजावे लागत आहे.
शासकीय संस्थेला वाघोली येथे तीन एकर जागा दिलेली असताना खासगी जागेचा आधार घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे शासनाला परवडणारे नाही.
>आयटीआयचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या हवेली तालुक्यातील विद्यार्थ्यांना वाघोली येथील शासकीय जागेमध्ये झालेल्या आयटीआयचा मोठा फायदा होणार असल्याने तहसीलदार व संस्थेने तीन एकरचा ताबा घेऊन सुसज्ज केंद्र उभारावे.
- किशोर सातव, माहिती अधिकार कार्यकर्ते

वाघोली येथे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेची दोनदा मोजणी करण्यात आलेली आहे. मोजणीच्या वेळी १२० गुंठे (तीन एकर) ऐवजी ५५ गुंठेच जागा उपलब्ध होत आहे. झालेले अतिक्रमण पाहता इतर ६५ गुंठे जागेचा हिशोबच लागत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या मिळालेल्या पत्रानुसार तहसीलदार यांची भेट घेऊन जागेचा ताबा घेण्यासाठी तारीख ठरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- उदय सूर्यवंशी, प्राचार्य, आयटीआय हवेली

Web Title: Take control of ITI space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.