शिक्षणसेवकांना सेवेत घ्या
By Admin | Published: May 19, 2016 02:46 AM2016-05-19T02:46:30+5:302016-05-19T02:46:30+5:30
शाळांच्या संचमान्यतेत सेवेतून कमी झालेल्या शिक्षणसेवकांना संरक्षण देण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली
मुंबई : शाळांच्या संचमान्यतेत सेवेतून कमी झालेल्या शिक्षणसेवकांना संरक्षण देण्याची मागणी शिक्षक परिषदेने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. वर्ष २०१३-१४ पासून विद्यार्थी संख्या कमी झाल्याने व तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण न होऊ शकल्याने शिक्षणसेवकांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली असून त्यांना सेवेत घेण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
याआधी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणसेवक म्हणून नोकरीतून बाहेर पडलेल्या एकाही शिक्षक किंवा शिक्षणसेवकाला बेरोजगार होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या आश्वासनाचे रुपांतर निर्णयात झाल्याचे दिसत नसल्याची टीका शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून सर्व शिक्षक व शिक्षणसेवकांना सेवेत सामावून घेण्याची मागणी मोते यांनी केली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती १९८१ च्या नियमावलीमधील तरतुदीनुसार कायम झालेल्या शिक्षकांना अतिरिक्त ठरल्यानंतर संरक्षण देण्यात आले. शिवाय त्यांचे समायोजन अन्य शाळांमधील रिक्त पदावर करण्यात आले. मात्र अद्यापही काही शिक्षक समायोजनाअभावी अतिरिक्त आहेत. मात्र अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी शिक्षणसेवक म्हणून काम करणारे शिक्षक हे सेवेतून बाहेर पडले असून त्यांना संरक्षण मिळालेले नाही. त्यांपैकी बहुतेक शिक्षण सेवक अनुशेष पूर्ण करण्यासाठी मागासवर्गीय शिक्षणसेवक होते. त्यामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षणसेवकांना तत्काळ सेवेत सामावून घेण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केले आहे.
शिक्षणसेवकांना सामावून घेणार - शिक्षणमंत्री
शाळांच्या संचमान्यतेत पद कमी झाल्याने शिक्षणसेवकांची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षणसेवकांविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल. शिवाय शिक्षणसेवकांचे समायोजन लवकरच केले जाईल, असेही तावडे यांनी आश्वासित केल्याचे बोरनारे यांनी सांगितले.