अपघात टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्या!
By admin | Published: May 20, 2014 03:40 AM2014-05-20T03:40:29+5:302014-05-20T03:40:29+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी,
मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, अशा सूचना नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के. धोवन यांनी दिल्या आहेत. नौदलप्रमुख झाल्यावर पश्चिम नौदलतळाला त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. धोवन हे १८ आणि १९ असे दोन दिवस मुंबई दौर्यावर आहेत. सोमवारी आयएनएस शिक्रा बोटीवर संचालनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सागरीसीमेवरील आव्हाने मोठी असून, या आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदलाचे सामर्थ्य वाढवण्याचे काम सुरू आहे. सामर्थ्य वाढवणे आणि अपघात टाळण्यासाठी नौदलाकडून प्राधान्याने लक्ष दिले जाईल. हे सांगतानाच सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वदेशी निर्मितीवर आमचा भर राहणार असून, विक्रमादित्य, तेग आणि शिवालिक श्रेणीच्या विमानवाहक युद्धनौका, चक्र आण्विक पाणबुडी आणि काही छोट्या-मोठ्या मध्यम आकाराच्या बोटींची स्वदेशी निर्मितीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या निर्मितीला वेळ लागणार असेल आणि नौदलाची गरज असेल तर वेळ पडल्यास तंत्रज्ञान आयातही केले जाईल. नौदलात काम करणारा प्रत्येक जण आपल्या कामात निपुण असून, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास ते सज्ज असल्याचेही नौदलप्रमुखांनी सांगितले. या वेळी विक्रांत लिलावाबाबत नौदलाची भूमिका काय, असे विचारले असता कोर्टाच्या आदेशाचे नौदल पालन करेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)