‘तीळगूळ घ्या, लक्ष ठेवा’!
By admin | Published: January 24, 2017 07:36 PM2017-01-24T19:36:01+5:302017-01-24T19:36:01+5:30
अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराससुद्धा सुरुवात केली आहे.
इच्छुक महिला उमेदवारांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम जोरात!
अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराससुद्धा सुरुवात केली आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधत हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. या कार्यक्रमातच ‘तीळगूळ घ्या, लक्ष ठेवा’, असे गोड आवाहनही केले जात आहे.
महापालिका निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत; उमेदवार यादी जाहीर न झाल्यामुळे थेट प्रचार करण्यास इच्छुक उमेदवारांना अडचणी येत आहेत. यावर इच्छुकांनी उपाय शोधून काढत, मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधला आहे.
अनेक भागांत इच्छुकांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून आपला प्रचार सुरू केला आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यमान नगरसेवकांसोबतच नव्यानेच राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही तीळगूळ घ्या...‘लक्ष ठेवा’, असे सांगत, स्वत:चे छायाचित्र असणारे कार्ड भेट देत आहेत, तर कोणी गृहोपयोगी वस्तूंचे वाण देत आहेत. काहींनी खास पत्रके छापून लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालविला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी इच्छुकांना खर्च करण्यास मोकळीक आहे. २७ जानेवारीनंतर मात्र उमेदवारांना खर्च करण्यावर बंधने येणार आहेत.