पाणी बाटल्यांच्या अवैध धंद्याला ऊत

By Admin | Published: March 2, 2017 12:51 AM2017-03-02T00:51:47+5:302017-03-02T00:51:47+5:30

पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे.

Take the illegal trade of water bottles | पाणी बाटल्यांच्या अवैध धंद्याला ऊत

पाणी बाटल्यांच्या अवैध धंद्याला ऊत

googlenewsNext

दीपक जाधव,

पुणे- पाणी बॉटल, २० लिटरचे जार यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. हडपसर, सोलापूर रोड, वाघोली, कोंढवा, हिंजवडी, चाकण, आळंदी रोड आदी परिसरांमध्ये अनधिकृतपणे त्याचे उत्पादन सुरू आहे. दुकानदारांना या बाटल्या व जार स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांच्याकडूनही त्यालाच पसंदी दिली जात आहे.
उन्हाचा कडाका वाढू लागल्या बरोबरच पाणी बॉटल, २० लिटरचे जार यांच्या मागणीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बाटलीबंद पाण्यावर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. हॉटेल, पाणपोई याठिकाणचे पाणी न पिता बाटलीबंद पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल असतो; मात्र बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायामध्ये चुकीच्या प्रवृत्तींनी शिरकाव केल्याने, या विश्वासाला तडा जात आहे. टँकर, बोअरिंग, विहिरींमधील पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता, ते सीलबंद करून विक्रीसाठी आणले जात आहे.
पाणी बॉटल, जार यांचे उत्पादन करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारे प्लांट उभारणे, त्या प्लांटला अन्न व औषध प्रशासन (एफडीआय); तसेच बीएसआय मार्क मिळविणे आवश्यक असते. पाणी योग्यप्रकारे शुद्ध केले जाऊन त्याचा दर्जा चांगला, योग्य असल्याची तपासणी करूनच त्यांना पाणी बॉटल उत्पादनाचा परवाना दिला जातो; मात्र शहराच्या विविध भागांमध्ये एफडीआय व बीएसआय मार्कची कोणतीही परवानगी न घेता, पाणी शुद्धीकरण करण्याचे प्लांट उघडण्यात आले आहेत.
बेकायदेशीरपणे उघडण्यात आलेल्या प्लांटमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यास फारसा खर्च केला जात नसल्याने त्यांच्याकडून अगदी स्वस्तामध्ये त्या दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
>ग्राहकांनी खबरदारी घ्यावी
पाणी योग्यप्रकारे शुद्ध न करता त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हे प्रकार थांबविण्याची जबाबदारी ग्राहकांवर आहे. आपण विकत घेतलेली बॉटल, पाण्याचे जार यांची कंपनी, त्यावरील बीएसआय मार्क आदी बाबींकडे लक्ष द्यावे. कंपन्यांनी २० लिटरच्या जारची मागणी नोंदविताना संबंधित प्लांटला भेट देऊन तिथे योग्य प्रकारे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते का, याची पाहणी करावी.
- ललित गलांडे,
अध्यक्ष, पुणे वॉटर बॉटल अँड जार असोसिएशन
>प्लांटमध्ये सुसज्ज लॅब
असणे आवश्यक
पाणी बॉटल, जार निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये शुद्ध केलेल्या पाण्याची नियमित तपासणी करण्यासाठी सुसज्ज लॅब असणे आवश्यक आहे. या लॅबमधून दररोज पाण्याची गुणवत्ता नियमित तपासली जाणे आवश्यक आहे; मात्र अनेक प्लांटमध्ये या लॅब नसल्याचे दिसून येत आहे.
>प्रशासनाचे दुर्लक्ष
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) तसेच बीआयएस मार्क यांची परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात पाणी बॉटल व २० लिटरचे जार बेकायदेशीरपणे बाजारात आणले जात आहेत; मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने खुलेआमपणे या बाटल्या व जार बाजारात विकले जात आहेत.
बेकायदेशीर प्लांट शोधून त्यांच्यावर धडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी पुणे वॉटर बॉटल अँड जार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी असोसिएशनच्या वतीने पुढाकार घेऊन या बेकायदेशीर प्लांटवर छापे टाकण्यात आले होते.
>बाजारामध्ये १ लिटरची पाणी बॉटल २० रुपयांना विकली जाणारी, दुकानदारांना अवघ्या ४ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
या बॉटलची मोठी आॅर्डर दिल्यास हा दर आणखी कमी केला जातो. अनेक कंपन्या व व्यावसायिक ठिकाणांना नियमितपणे पिण्याच्या पाण्याचे २० लिटरचे जार पुरविले जातात.
या जारमधील पाणीही योग्य प्रकारे शुद्ध न करता पुरविले जात आहे. जारद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ५० टक्के पाणी योग्य प्रकारे शुद्ध केले जात नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Take the illegal trade of water bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.