टीकेकडे दुर्लक्ष करून उपक्रम पुढे न्यावा
By admin | Published: October 17, 2016 02:45 AM2016-10-17T02:45:36+5:302016-10-17T02:45:36+5:30
‘रायगड भूषण’ पुरस्काराच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे राजकीय अभिनिवेशातून टीकाटिप्पणी होत आहे.
रोहा : ‘रायगड भूषण’ पुरस्काराच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे राजकीय अभिनिवेशातून टीकाटिप्पणी होत आहे. मात्र हा सन्मान समाजातील गुणवंतांचा असून, टीकेकडे दुर्लक्ष करून रायगड जिल्हा परिषदेने हा उपक्रम असाच पुढे न्यावा, असे प्रतिपादन आमदार सुनील तटकरे यांनी केले.
रोहा येथील सी.डी. देशमुख सभागृहात रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ८४ सत्कारमूर्तींना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जि. प. सदस्य नंदकुमार म्हात्रे, माजी जि.प. अध्यक्षा नीलिमा पाटील, रोहा पं.स. सभापती लक्ष्मण महाले, नगराध्यक्ष समीर शेडगे, सखुबाई पिंगळा, जनाबाई जाधव, मीनाक्षी रणपिसे, गीता पालरेचा, तसेच विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, सत्कारमूर्ती निरपेक्ष भावनेने समाजासाठी योगदान देत आहेत. चांगल्या कामाची नोंद नेहमीच समाज घेत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समाजावर पडून जिल्ह्यातील अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळावी, यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करता यावी, यासाठी आमचा नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड भूषण या नावातच मोठी ताकद आहे. सत्कारमूर्तींची यादी मोठी आहे. त्याप्रमाणेच त्यांचे समाजातील कार्यही मोठे आहे. सत्कारमूर्ती गुणवंतांचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, असे विचार यावेळी आ. धैर्यशील पाटील यांनी मांडले.
समाजसेवक कानू उघाटे, महादेव गोळे, जीवन पाटील, आविष्कार देसाई, संतोष पेरणे, गीतरामायण कलाकार चंद्रकांत चव्हाण, कीर्तनकार ह.भ.प. दिलीप शिंदे, थायबॉक्सिंग राष्ट्रीय खेळाडू नूपुर मोरे, साहित्यिक दिवाकर गंधे, शिक्षण महर्षी घनश्याम घोसाळकर, समाजसेवक विष्णू पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेघा घाटे, पथनाट्य कलाकार प्रतिम सुतार, कुस्ती क्षेत्रातील प्रकाश हातमोडे, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे डॉ. बबन नागरगोजे, समाजसेवक सुदेश दळवी, जलतरणपटू सुनील पवार, गिनीज बुकमध्ये नोंद झालेली मृणाल महाजन, क्रीडापटू श्रावण ठाकूर, रायगड जिल्हा मराठी शाहीर परिषदेचे अध्यक्ष उमाजी म्हस्के आदी ८४ गुणवंतांचा रायगड भूषण देऊन गौरव करण्यात आला.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले तर अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आभार मानले. कार्यक्र माच्या ढिसाळ नियोजनावरून आ.सुनील तटकरे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची कानउघाडणी केली. (वार्ताहर)