‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, रामटेक येथे शांतिनाथ जैन मंदिरात राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:20 AM2017-09-23T05:20:33+5:302017-09-23T16:52:57+5:30
कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले. विद्यासागरजी महाराज हे आपल्या मुनिसंघासोबत अतिशय श्रीक्षेत्र रामटेक येथील या जैन मंदिर परिसरात चातुर्मास करत आहेत.
नागपूर : कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ‘इंडिया’ला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना केले. विद्यासागरजी महाराज हे आपल्या मुनिसंघासोबत अतिशय श्रीक्षेत्र रामटेक येथील या जैन मंदिर परिसरात चातुर्मास करत आहेत.
आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या दीक्षा घेण्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयम स्वर्ण महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. सकाळी ११.५० च्या सुमारास राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी उपस्थित होते.
सुरुवातीला राष्ट्रपती व सर्व मान्यवरांनी आचार्यश्रींना नमन करुन श्रीफळ अर्पण केले. यानंतर राष्ट्रपतींनी शांतिनाथ जैन मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खासगी कक्षात आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला.
इसवी सन सुरू होण्याच्या अगोदरपासून देशाला भारत हे नाव आहे. ‘इंडिया’ व ‘भारत’ या दोन्ही नावांतून वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. भारत स्वदेशी भावनेशी जुळला आहे. त्यामुळे देशाच्या नीतीनिर्मात्यांनी भारत याच नावाचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. भारतीयत्वाची अर्थात आपल्या संस्कृती व सभ्यतेची ओळख देशाच्या प्रत्येक नागरिकाला व जगाला व्हावी, यासाठी धोरण ठरावे, अशी अपेक्षा आचार्यश्रींनी व्यक्त केली. तसेच विविध देशांचे उदाहरण देत मातृभाषेत शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचेही आचार्यश्रींनी सांगितले. आचार्यश्रींनी रचलेले महाकाव्य ‘मूकमाटी’च्या उर्दू आवृत्तीचे राष्ट्रपतींनी प्रकाशन केले.
>आचार्यश्रींना भेटून आत्मिक समाधानाची अनुभूती - राष्ट्रपती
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी राजभवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना भेटून आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते, अशी भावना कोविंद यांनी व्यक्त केली. कोविंद यांची आचार्यश्रींसोबत ही दुसरी भेट आहे. मागील वर्षी आचार्यश्रींचा चातुर्मास भोपाळमध्ये झाला होता. त्यावेळी एका विशेष कार्यक्रमात बिहारचे राज्यपाल या नात्याने कोविंद यांनी आचार्यश्रींचे आशीर्वाद घेतले होते. शुक्रवारच्या भेटीत या आठवणींना उजाळा मिळाला.
>राष्ट्रपतींनी घेतली जैन मुनी आचार्यांची भेट : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील ऐतिहासिक शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांची भेट घेऊन अभिवादन केले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवर उपस्थित होते.
>नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले व मान्यवर उपस्थित होते.