२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:18 AM2020-04-10T06:18:56+5:302020-04-10T06:19:31+5:30
केंद्र सरकारकडे मागणी; तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे, सरकारी बॉन्डच्या माध्यमातून लोकांना पैसे द्यावेत, या आणीबाणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला २१ लाख कोटींची गरज लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.
अमेरिकेची अर्थव्यवस्था २१ तर चीनची १४ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. भारताची २.८ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. अमेरिकेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या १० टक्के म्हणजे जवळपास २.२ ट्रिलीयन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. इंग्लंडने १६ टक्के, जर्मनीने २२ टक्के पॅकेज जाहीर केले आहे. आपणही अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात १० टक्के पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी फक्त १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ते अत्यंत कमी आहे. आज कर्ज काढले म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार करण्याची वेळ नाही. मजुरापासून ते पगारी नोकरदारापर्यंत सगळ्यांना पैसा द्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.
लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांकडे पैसाच नसेल तर सगळा बाजार ठप्प होईल. त्यासाठी ग्रामीण भागात क्रयशक्ती वाढवावी लागेल. बाजाराची परिस्थिती जर खराब असेल तर काहीही विकत घेण्याची मानसिकताच उरणार नाही. राष्टÑीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी चालतील, असे केंद्राने जाहीर केले आहे पण पैसाच नसेल तर लोक हप्ते व व्याज भरतील कसे? त्यामुळे या तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे, , असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्या यांचेही तीन महिन्यांचे व्याज माफ करुन त्यांना देखील ही सवलत द्यावी. खासगी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यांचाही सरकारने विमा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.