स्फोटक अमोनियम नायट्रेटच्या व्यवहारावर आॅनलाइन करडी नजर
By admin | Published: August 25, 2015 02:20 AM2015-08-25T02:20:43+5:302015-08-25T02:20:43+5:30
अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकाचे प्रमाण ते विकणाऱ्याच्या खात्यावर लॉगइन होऊन आता कोणत्याही वेळी पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी तपासणार आहेत.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकाचे प्रमाण ते विकणाऱ्याच्या खात्यावर लॉगइन होऊन आता कोणत्याही वेळी पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी तपासणार आहेत. या स्फोटकाचे प्रमाण तपासण्याची ही सोय पेट्रोलियम अॅण्ड एक्स्प्लोझिव्हज् सेफ्टी आॅर्गनायझेशनवर (पीईएसओ) आधीच आॅनलाइन उपलब्ध असली तरी तिचा वापर क्वचितच झालेला आहे.
‘पेसो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात ही तपासणी होईल. दहशतवादी कारवायांचा महाराष्ट्राला नेहमीच मोठा धोका असतो. त्यामुळे या धोकादायक स्फोटक पदार्थाच्या वाहतुकीवर किंवा देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याकडील त्यासंदर्भातील माहिती त्यांच्याकडील माहितीत विलीन करण्याची तातडीने गरज आहे. पेसोचे आधीचे नाव हे डिपार्टमेंट आॅफ एक्स्प्लोझिव्हज् असे होते.
अमोनियम नायट्रेट २०११मध्ये स्फोटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामुळे ते विकत घेणे किंवा विकणे यावर नियंत्रणे आली. परवान्याशिवाय अमोनियम नायट्रेट विकण्यावर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. इम्प्रोव्हाईजड् एक्स्प्लोझिव्हज् डिव्हाईस (आयईडी) तयार करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन (आयएम) व लष्कर-ए-तय्यबासारख्या (एलईटी) दहशतवादी संघटना अमोनियम नायट्रेटचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे आम्ही अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकांच्या खरेदी आणि विक्रीचा सर्व व्यवहार आॅनलाइन केला आहे. हे सगळे व्यवहार इंटरनेटवर करून घेण्याचे अनेक उद्देश आहेत. सगळ्यात आधी या स्फोटकाचा साठा किती आहे हे समजते.
हा व्यवहार करताना विक्रेत्याला कोणत्या तारखेला त्याची वाहतूक होणार आहे हे व त्याच्या प्रवासाच्या प्रवास मार्गाचा तपशीलही द्यावा लागतो. ज्या मार्गाचा उल्लेख त्याने केला आहे त्या मार्गाशिवाय इतर मार्ग त्याला वापरता येत नाही. शिवाय आमच्या खात्याने प्रवासात अनेक प्रकारे त्यावर लक्ष ठेवलेले असते.
राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आम्ही आमच्या वेबसाईटसाठी लॉगइन आयडीज् दिल्या आहेत. यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली विशिष्ट वेळी नेमक्या किती अमोनियम नायट्रेटचा साठा कुठे उपलब्ध आहे व त्याच्या हालचालींवर त्यांना लक्ष ठेवता येईल. खेदाची बाब अशी की ही चांगली सोय क्वचितच कोणी वापरली, असे पेसोच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सुटे न विकण्याची सूचना : खाणींतील दगड फोडण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाला आहे व आता दहशतवादी त्याचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी करतात. महाराष्ट्र दहशतवादविरोधी तुकडीच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी हे स्फोटक सुट्या स्वरूपात विकू नका, असे डिलर्सना सांगितले आहे. पण पेसोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी त्याचे जे प्रमाण वापरले तेवढे स्फोटक मिळविणे फार काही अवघड नाही. जहाजांतून शेकडो कंटेनर्समधून अमोनियम नायट्रेटची वाहतूक केली जाते व तेथून त्याची चोरी केली जाते.