महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या, शिवसेना स्वबळावर विजयी होईल - उद्धवनी सुनावले

By admin | Published: November 9, 2015 09:05 AM2015-11-09T09:05:59+5:302015-11-09T11:13:33+5:30

बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली असून महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल, भविष्यकाळ आमचाच आहे, असे उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.

Take Maharashtra elections, Shiv Sena will win on its own | महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या, शिवसेना स्वबळावर विजयी होईल - उद्धवनी सुनावले

महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या, शिवसेना स्वबळावर विजयी होईल - उद्धवनी सुनावले

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - बिहार निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरं जावे लागलेल्या भारतीय जनता पक्षावर मित्रपक्ष शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडत दिल्ली विधानसभेचे निकाल ज्यांनी ‘सहज’तेने घेतले मात्र बिहारचे निकाल गांभीर्याने घ्यावे लागतील, असे सुनावले आहे. तसेच ' बिहार निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढली असून महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्यास शिवसेना विजयी होईल' असा इशारा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.  ' आमचे पाय जमिनीवर आहेत, ज्यांचे नव्हते ते आपटले' अशा कानपिचक्याही 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आल्या आहेत.
 
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मोठा पराभव स्वीकारावा लागला असून नितिश कुमार, लालूप्रसाद यादव व काँग्रेस यांच्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्या पार्श्वभूमीवर शिवेसेनेने भाजपाला चांगलेच सुनावले आहे. 'संपूर्ण साधनसंपत्ती पणाला लावूनही भाजपचा पराभव झाला, उलट नीतिशकुमारांनी उपलब्ध साधनसंपत्तीच्या बळावर बिहारमध्ये बहार आणली', अशा शब्दांत उद्धव यांनी नीतिशकुमारांची स्तुती केली आहे. तसेच सत्ता व पैशांचा वारेमाप वापर करून एकदा जिंकता येते, एखाद्याला एकदाच मूर्ख बनवता येते, वारंवार नाही, असेही उद्धव यांनी भाजपा व मोदींना सुनावले.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे -
- बिहारचे निकाल ‘भाजप’च्या बाजूने लागतील असे सांगणारे ‘सर्व चाणक्य’ तोंडावर आपटले आहेत. बिहारात ‘कांटे की टक्कर’ होईल व विधानसभा त्रिशंकू राहील असे सांगणारे ‘सर्व्हे’ खोटे ठरले आहेत. बिहारातील निवडणुकीचे निकाल एकतर्फी लागले व सत्ता-संपत्तीचे ‘वतनदार’ नितीशकुमारांच्या रणनीतीसमोर पाचोळ्यासारखे उडून गेले. नितीशकुमार यांच्या विजयाने देशातील राजकीय समीकरणे बदलतील काय? या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल. कारण बिहारची भूमी ही राष्ट्रीय राजकारणाची भूमी आहे. बिहारच्या रक्तात व मातीत राजकारण आहे. दिल्ली विधानसभेचे निकाल ज्यांनी ‘सहज’तेने घेतले त्यांना बिहारचे निकाल गांभीर्याने घ्यावे लागतील. कारण बिहारच्या मैदानात नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी असा जंगी सामना होता.
-  बिहारची निवडणूक रणधुमाळी ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आठवण करून देणारी होती. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांसह संपूर्ण केंद्रीय सत्ता महाराष्ट्रात उतरली. राज्या-राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, देशभरातले खासदार-आमदार-धनदांडगे येथे तळ ठोकून बसले, पण ती कोंडी फोडून शिवसेनेने ६३ जागांपर्यंत स्वबळावर उसळी मारलीच. बिहारातही त्याच सत्ता-संपत्ती आणि घोषणांचा वापर झाला. दीड लाख कोटी पॅकेजची बोली पंतप्रधानांनी लावली. मात्र तरीही नीतिशकुमारांचा विजय का झाला? याचे पहिले कारण म्हणजे नितीशकुमार यांनी थापा मारल्या नाहीत व बिहारच्या जनतेला विश्‍वासात घेऊन ते काम करीत राहिले. त्यांनी खोटी स्वप्ने दाखवली नाहीत. सत्ता व पैशांचा वारेमाप वापर करून एकदा जिंकता येते. जसे एखाद्याला एकदाच मूर्ख बनवता येते, वारंवार नाही
- लोकसभा निवडणुकांच्या विजयानंतर फक्त दीड वर्षात झालेली ही पडझड आहे. या पडझडीची जबाबदारी आता कोण घेणार? भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे शेवटी त्यांनाच शोधायची आहेत. भारतीय जनता पक्षाचे काय चुकले यावर आम्ही पामर काय भाष्य करणार? मोदी यांनी पंतप्रधान म्हणून बिहारात ३०च्या वर प्रचंड सभा घेतल्या. त्या सभांचे फलित म्हणायचे तर ५५ जागासुद्धा नाहीत. शिवसेना बिहारात एका जिद्दीने लढली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘ओवेसी’च्या एमआयएमपेक्षा शिवसेनेचे मताधिक्य जास्त आहे हा एक प्रकारे विजयच आहे. शिवसेना महाराष्ट्राबाहेर पसरते आहे. भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे. बिहार निकालाचा संदेश इतकाच की, महाराष्ट्रात कधीही निवडणुका घ्या. शिवसेना विजयाची गरुडझेप स्वबळावर घेईल. ही लोकभावना उद्याचा जनादेश आहे. 
 

Web Title: Take Maharashtra elections, Shiv Sena will win on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.