मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार

By admin | Published: March 30, 2017 04:41 AM2017-03-30T04:41:42+5:302017-03-30T04:41:42+5:30

वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे

To take the Metro rail from Mira-Bhairindar | मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार

मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार

Next

मुंबई : वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
मुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभार्इंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांनी अनुभवला होता लोकलचा प्रवास
मीरा रोडवरून आपणही एकदा लोकलने मुंबईत आलो होतो, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, सकाळी साडेआठच्या सुमारास मी मीरारोडला होतो. लोकल आल्यानंतर स्टेशनवरील सुमारे तीन हजार प्रवासी ती प्लॅटफॉर्मवर यायच्या आतच लोकलमध्ये घुसले. मी देखील कसाबसा आत शिरकाव केला. दादर येईपर्यंत मला हात देखील खाली करता आला नाही. स्वत:च्या हाताला खाज आली तर स्वत:चा हात देखील खाजवू शकत नव्हतो इतकी गर्दी होती. मुख्यमंत्र्यांच्या या अनुभवकथनाने सभागृहात हशा पिकला.

Web Title: To take the Metro rail from Mira-Bhairindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.