संभाजी भिडेंना ताब्यात घ्या - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:47 AM2018-05-03T05:47:00+5:302018-05-03T05:47:00+5:30
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे (गुरुजी) यांना अटक करावी, तसेच त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी करावी,
मुंबई : कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे (गुरुजी) यांना अटक करावी, तसेच त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली.
वांद्रे येथील जिल्हा अधिकारी कार्यालयावर रिपाइंच्या वतीने मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चाचे संविधान बंगल्यासमोर सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी आपल्या शीघ्रकवितेने आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘अनेकांच्या नाकाला झोबल्या मिरच्या, कारण मी काढला आहे मोर्चा, त्यांना काढू द्या कोणताही परचा, मात्र मी काढणार बहुजनांच्या प्रश्नांवर वेळोवेळी मोर्चा’ असे आठवले म्हणाले. सत्तेत असलो, तरी संघर्ष विसरलो नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही नामांतराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. आता केंद्रीय मंत्री असलो, तरी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार. हा मोर्चा सरकारच्या विरुद्ध नसून सरकारला बळकटी देण्यासाठी आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही आणि आरक्षण कोणी घालवू शकत नाही. मात्र, याबाबत खोटा प्रचार करून, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांविरुद्ध हा मोर्चा आहे, असे आठवले म्हणाले.