दोन दिवसांत तोडगा काढा; अन्यथा जिल्हापातळीवर आंदोलन करू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:35 AM2019-05-16T05:35:58+5:302019-05-16T05:40:05+5:30
वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असली, तरी राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती दिली आहे.
मुंबई : वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली असली, तरी राज्य सरकारने या प्रवेशप्रक्रियेला सात दिवस स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश निश्चिती होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याच्या निधार्रामुळे विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन १० व्या दिवशीही सुरूच राहिले. दरम्यान, येत्या दोन दिवसात प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तोडगा न काढल्यास जिल्हा पातळीवर (जिल्हाधिकारी/ तहसीलदार कार्यालय) शांततेच्या मार्गाने ठिय्या, धरणे आंदोलने सुरू करण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने परभणी, हिंगोली, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी निवेदने दिली. दरम्यान, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आंदोलनस्थळाला भेटी दिल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू - छत्रपती संभाजी महाराज
दरम्यान, आंदोलनाच्या दहाव्या दिवशी भाजपचे खासदार छ. संभाजी महाराज यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. राज्य शासनाने चांगल्या भावनेने मराठा आरक्षण दिले होते. काही त्रुटींमुळे आरक्षणाचा फटका मेडिकलच्या विद्यार्थ्यांना बसला. त्यातून आता हे आरक्षण न्यायालयात टिकेल, हे सिद्ध करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे मांडून चर्चेतून तोडगा काढू असे, आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले असल्याची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची बुधवारी भेट घेतली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवास्थानी भेट घेतली आणि प्रवेशाचा तिढा सोडविण्याची मागणी केली. प्रवेशाचा हा तिढा सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे अश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली.