फडणवीस आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्या - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 10, 2017 07:58 AM2017-04-10T07:58:02+5:302017-04-10T07:58:02+5:30

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना देवेंद्र फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Take some serious credit from Fadnavis Adityanath - Uddhav Thackeray | फडणवीस आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्या - उद्धव ठाकरे

फडणवीस आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्या - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना देवेंद्र फडणवीस सरकारला खडे बोल सुनावले आहेत. उत्तरप्रदेश सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली पण महाराष्ट्र सरकार योगी मॉडेलचा अभ्यास करुन निर्णय घेणार आहे. दुसऱ्यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वतःचा पाळणा हलवून विकासाचे पोर कधी केकाटणार हे जरा गांभीर्याने घ्या. नाहीतर महाराष्ट्राचे देशाच्या नकाशावरील गांभीर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही अशा शब्दात फडणवीस सरकारवर टीका केली आहे. 
 
आमचे सरकार ‘योगी’ मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत अजून दहा हजार शेतकरी प्राण सोडतील असे अग्रलेखात म्हटले आहे.  मुख्यमंत्रीपदाची वगैरे शपथ ‘गंभीर’तापूर्वक घेण्याची परंपरा आहे. पण राज्यकर्ते खुर्च्यांवर बसल्यावर किती गांभीर्याने काम करतात हा प्रश्नच आहे. 
 
नुसते चेहऱ्यांवर गांभीर्याचा मुखवटा लावून चालत नाही, तर तो गंभीर रस कृतीत उतरावा लागतो. नाहीतर त्याची अवस्था महाराष्ट्र सरकारसारखी होते. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्यायला हवे असा उद्धव यांनी म्हटले आहे. ‘योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले  अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे  असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- ‘योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले  ‘अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे. धुळीस मिळालेले राज्य वर उचलण्याची योगी आदित्यनाथ यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे व ते कामाच्या बाबतीत कमालीचे गंभीर आहेत. योगींनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण आमचे सरकार ‘योगी’ मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. दुसऱ्यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वतःचा पाळणा हलवून विकासाचे पोर कधी केकाटणार हे जरा गांभीर्याने घ्या. नाहीतर महाराष्ट्राचे देशाच्या नकाशावरील गांभीर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
 
- मुख्यमंत्रीपदाची वगैरे शपथ ‘गंभीर’तापूर्वक घेण्याची परंपरा आहे. पण राज्यकर्ते खुर्च्यांवर बसल्यावर किती गांभीर्याने काम करतात हा प्रश्नच आहे. नुसते चेहऱ्यांवर गांभीर्याचा मुखवटा लावून चालत नाही, तर तो गंभीर रस कृतीत उतरावा लागतो. नाहीतर त्याची अवस्था महाराष्ट्र सरकारसारखी होते. गांभीर्याचा ‘तुटवडा’ स्वतःकडे असलेले लोकच इतरांच्या गांभीर्याचा दुःस्वास करीत असतात. पण महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून थोडे गांभीर्य उधारीवर घ्यायला हवे. योगी महाराजांना राज्यकारभार करता येईल काय, राज्य करणे म्हणजे गोरखपूरचा मठ चालवण्याइतके सोपे आहे काय या सर्व शंकांची जळमटे दूर करून योगींनी कामांचा धुमधडाकाच लावला आहे. उत्तर प्रदेशात योगींनी ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ सुरू करण्याची योजना जाहीर केली. सामान्यांच्या आणि गोरगरीबांच्या हितासाठी त्यांनी पोटाच्या प्रश्नाला हात घातला हे बरे झाले. ज्याला पोटाची भाषा समजते व पोटाचे प्रश्न जो सोडवतो तोच लोकप्रिय राज्यकर्ता ठरतो. जयललिता यांनी तामीळनाडूत ‘अम्मा कॅण्टीन’चा उपक्रम सुरू केला व तो लोकप्रिय झाला. लोकांना तिथे स्वस्तात दोनवेळचे जेवण दिले जाते. शेवटी गरीबांसाठी पोटाची आग शांत होणे हेच महत्त्वाचे असते. तेव्हा सरकारने त्या दृष्टीने काही योजना सुरू केल्या आणि त्या गरीबांना परवडणाऱ्या असल्या तर अशा योजना लोकप्रिय ठरतात. लोकांना घरावर सोन्याची कौले चढवून कधीच नको असतात. त्यांच्या पोटापाण्याचे, रोजगाराचे प्रश्न सोडवले तरी ते खुशीत असतात.
 
- शिवसेनेने सुरुवातीपासून नेमके तेच केले. रोजगाराचे म्हणजे नोकरीचे प्रश्न सोडवले. भूमिपुत्रांना नोकऱ्यांत ८० टक्के प्राधान्य मिळायलाच हवे ही भूमिका घेऊन शिवसेना उभी राहिली तेव्हा प्रांतीयवादाचा शिक्का मारला गेला, पण हाच भूमिपुत्रांच्या हक्कांचा प्रश्न घेऊन आता फक्त प्रादेशिक पक्षच नव्हेत तर राष्ट्रीय पक्षदेखील उभे आहेत. योगी आदित्यनाथ हे एका राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्री आहेत व त्यांनीही सूत्रे हाती घेताच उत्तर प्रदेशातील रोजगारांत भूमिपुत्रांनाच प्राधान्य देण्याची घोषणा केली. हा शिवसेनेच्या भूमिकेचा विजय आहे, पण मुंबईत भूमिपुत्रांसाठी आवाज उठवताच तो प्रांतीयवाद आणि गुंडागर्दी ठरते व इतरांचे मात्र जनहिताचे धोरण असते. शिवसेनेने ‘वडापाव’ हा गोरगरीबांचे अन्न व बेरोजगारांना रोजगाराचे साधन म्हणून दिला, पण त्या ‘वडापाव’ची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावर जाऊनही तो अनेकदा कुचेष्टेचा विषय ठरतो. आता ‘योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले ‘अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना झुणका भाकर केंद्रे सुरू केली गेली ती गोरगरीबांच्या पोटपूजेसाठी. तब्बल दोन दशकांपूर्वी शिवसेनेने सुरू केलेल्या झुणकाभाकर योजनेमुळे गोरगरीबांना केवळ ५० पैशांमध्ये पोटभर झुणका भाकर मिळण्याची सोय झाली होती. मात्र गरीबांच्या या पोट भरण्यामुळेही अनेकांना पोटदुखी झाली आणि या झुणकाभाकर केंद्रांच्या विरोधात अगदी न्यायालयांपासून सगळ्यांनीच शड्डू ठोकला. गरीबांसाठी सुरू झालेली ही योजना बंद पाडूनच त्यांची डोकी शांत झाली. ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरांची योजनादेखील त्यावेळी शिवसेनेने फक्त जाहीर केली नाही तर लोकांना घरांच्या चाव्या देण्याचे कार्यक्रम पार पडले.
 
- योगी आज त्यांच्या राज्यात तेच काम नेटाने करीत आहेत. धुळीस मिळालेले राज्य वर उचलण्याची योगी आदित्यनाथ यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे व ते कामाच्या बाबतीत कमालीचे गंभीर आहेत. त्या गांभीर्याचा थोडा अंश जरी येथील राज्यकर्त्यांनी घेतला तरी महाराष्ट्रात फडणवीस सरकारचे कल्याणपर्व सुरू होईल. योगींनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण आमचे सरकार ‘योगी’ मॉडेलचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे. हा अभ्यास पूर्ण होईपर्यंत अजून दहा हजार शेतकरी प्राण सोडतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी असेही सांगितले की, ‘आपण कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. किंबहुना त्यांना कायमचे कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न आहेत!’ मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे हे ‘विचार’ यापूर्वीही मांडले आहेत. त्यात नवीन काही नाही, शेतकऱ्याला कर्जाच्या खाईतून कायमचे बाहेर काढण्याबद्दल कोणाला काही आक्षेप असण्याचे कारण नाही, पण आज जे हजारो शेतकरी कर्जबाजारीपणापायी स्वतःला मृत्यूच्या खाईत ढकलत आहेत त्यांचे काय? त्यांना या खाईतून बाहेर काढण्याविषयी राज्य सरकार कधी ‘गंभीर’ होणार? अर्थात ‘सरकार’ नावाची डोकी बऱयाच गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत त्यास कोणी काय करायचे! उत्तर प्रदेशात विजय झाला त्याचे लाडूवाटप अद्याप महाराष्ट्राच्या मंत्रालयात केले जात आहे. दुसऱ्यांचा पाळणा हलविण्यापेक्षा स्वतःचा पाळणा हलवून विकासाचे पोर कधी केकाटणार हे जरा गांभीर्याने घ्या. नाहीतर महाराष्ट्राचे देशाच्या नकाशावरील गांभीर्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

Web Title: Take some serious credit from Fadnavis Adityanath - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.