महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, छगन भुजबळांचे नाशिक पोलीस आयुक्तांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:41 PM2021-09-28T22:41:06+5:302021-09-28T22:41:33+5:30
Chhagan Bhujbal orders to Nashik Police Commissioner : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
मुंबई : आज महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
आमदारांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण अतिशय गंभीर असून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच याबाबत माहिती मिळाली आणि आपण ही माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अश्या प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नसल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.
आमदार सुहास कांदे यांना धमकी
नांदगाव मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीच्या वाटपावरुन निर्माण झालेला वाद आता चांगलाच रंगला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे.
सोमवारी (दि.२७) कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संशयित अक्षय निकाळजे नावाच्या व्यक्तीेेने फोन केला. यावेळी त्याने ‘मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जे रिट पिटिशन दाखल केलेले आहे, ते कोर्टातून काढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियांसाठी चांगले होणार नाही...’ अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे.