अर्भक मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करा
By admin | Published: March 16, 2015 02:50 AM2015-03-16T02:50:33+5:302015-03-16T02:50:33+5:30
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयातून परत पाठवून दिलेल्या गरोदर महिलेच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी रु ग्णालयातील सर्व
ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयातून परत पाठवून दिलेल्या गरोदर महिलेच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी रु ग्णालयातील सर्व संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहेत. तसेच याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना दिले.
जालन्याहून आलेल्या शारदा घोडे यांना वैद्यकीय तपासणीसाठी लागणारे ८०० रु पये नसल्यामुळे रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रस्त्यावरच त्यांची प्रसूती झाली. मात्र बाळाला वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी सध्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शारदा व त्यांचे पती गंगाराम घोडे यांची रविवारी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच, या प्रकरणी जबाबदार असलेल्यांची गय न करता कठोर कारवाईचे आदेश आयुक्त जयस्वाल यांना दिले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना दिले. दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.