अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 03:02 PM2023-03-20T15:02:08+5:302023-03-20T15:03:38+5:30

Chhagan Bhujbal : खारघर व नवी मुंबई येथील अवैध दारु वाहतुकीबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला.

Take strict action against those selling illegal and fake liquor says Chhagan Bhujbal | अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा - छगन भुजबळ

अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा - छगन भुजबळ

googlenewsNext

मुंबईसह महाराष्ट्रात अवैध तसेच बनावट दारू विक्रीमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. हा प्रकार बिहारसह इतर राज्यात होतो असे नाही आपल्या राज्यातही अवैध तसेच बनावट दारू विक्रीची प्रकार घडताय हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे सभागृहात केली. त्यावर उत्तरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोरात कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

खारघर व नवी मुंबई येथील अवैध दारु वाहतुकीबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने खारघर व नवी मुंबई येथे बेकायदा वाहतूक केली जाणारी साधारण ७६ लाखांची दारु जप्त केली आहे. ही हलक्या प्रतीची गोव्यात बनविण्यात आलेली दारू गुजरातमध्ये नेऊन नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्यात येत आहे. हे प्रकार मुंबईसह राज्यात होत असून बनावट व अवैध दारूमुळे अनेकांना आपला जीव गमावला आहे. ही बाब गंभीर असून मुख्य आरोपीला शोधून हे प्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी कठोरात कठोर कारवाई अशी मागणी केली.

यावेळी उत्तरात मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की,  सदर प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ खाली गु.र. क्र. २५२ / २०२२ नोंदविण्यात आला असून या प्रकरणी जप्त केलेल्या मुद्देमालाची वाहनासह एकूण किंमत अंदाजे रुपये ७६.७७ लाख इतकी आहे. सदर प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोरात कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: Take strict action against those selling illegal and fake liquor says Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.