"निवडणूक घ्या, लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील...", जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:34 PM2023-06-14T19:34:28+5:302023-06-14T19:35:04+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का? कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.
मुंबई : हा काही सर्व्हे करायचा वेळ नाही, मात्र सर्व्हेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. मात्र सरकार सर्व्हे करून स्वतःची लोकप्रियता तपासण्यात व्यस्त आहे. हे सरकार ना जिल्हा परिषद निवडणुका घेत आहे, ना मनपा निवडणुका घेत आहे. निवडणूक घ्या लोकं स्वतःच लोकप्रियता सांगतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काही तांत्रिक कारणामुळे पक्षाने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने त्या उमेदवाराला निवडून दिले ते आज पक्षासोबत नाही मात्र ती जागा आपणच लढावी यासाठीही तेथील कार्यकर्ते आग्रही आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अज्ञात समर्थकाने काल मंगळवारी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या, ज्यात फक्त मोदी आणि शिंदे यांचाच फोटो होता. महाराष्ट्रात शिंदे लोकप्रिय किती याची माहिती, त्या जाहिरातीत देण्यात आली होती. या जाहिरातीनंतर 'वरून डोळे वटारण्यात आले' असेल आणि म्हणून डोळे वटारल्यानंतर आज लगेच नवी जाहिरात देण्यात आली त्यात फडणवीसांसह सर्वांचे रीतसर फोटो छापले गेले आहे असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आज शेतकरी हवालदिल झाला आहे, पाऊस नसल्याने मोठे संकट त्यांच्यासमोर आहे. मात्र या सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. या सरकारचा फक्त जाहिरातबाजीवर भर आहे. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर सतत यांचे फोटो दाखवले जात आहेत. शिंदे गटात आणि भाजपमध्ये अंतर्गत युद्ध दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? त्यांच्यावर काही दबाव आहे का? म्हणून जाहिराती बदलाव्या लागत आहेत, अशी शंका येते. कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे कोणी तरी मुख्यमंत्र्यांना घालून देत आहे का? असे अनेक प्रश्न जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.