महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्या, भगतसिंह कोश्यारींचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 05:31 AM2022-06-05T05:31:34+5:302022-06-05T05:32:07+5:30
bhagat singh koshyari : अनेकदा महाराष्ट्र व गुजरातमधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचा गुण आपण घेतला पाहिजे, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.
मुंबई : हिंदी भाषिक लोक केवळ आपली प्रादेशिक असलेली हिंदी भाषा बोलतात, परंतु महाराष्ट्रातील लोक मराठीशिवाय हिंदी भाषादेखील उत्तम बोलतात. अनेकदा महाराष्ट्र व गुजरातमधील लोक मूळ हिंदी भाषिक लोकांपेक्षा अधिक चांगली हिंदी बोलतात. हा बहुभाषिकतेचा गुण आपण घेतला पाहिजे, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला.
उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे 'उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा' या विषयावर एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात शनिवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. एखादी भाषा केवळ लिहून - वाचून येत नाही, तर भाषा ऐकून, व्यवहारात आणून व बोलून चांगली आत्मसात होते, असे सांगताना उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊँनी व इतर भाषा बोलल्या पाहिजेत, मुलांना शिकविल्या पाहिजेत, आपापसात आपल्या भाषेत बोलले पाहिजे तसेच आपल्या भाषेत लघुपट, माहितीपट व सिनेमांची निर्मिती केली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. भाषा प्रसारासाठी मिशन मोडवरच काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.