रस्त्यावर उतरून विरोध करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवारांनी दिला पाच कलमी कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:58 AM2023-10-12T09:58:02+5:302023-10-12T09:58:34+5:30
कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा लागेल.
मुंबई : राज्य सरकारच्या विद्यार्थी, तरुण, महिलांविरोधातील धोरणांचा रस्त्यावर उतरून विरोध करा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला पाच कलमी कार्यक्रम दिला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत शरद पवार बोलत होते.
कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा लागेल.
मणीपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते, त्यांना जिवंत मारले जाते. याबाबत जागरूक राहावे लागेल. असा प्रकार घडला तर राष्ट्रवादीच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजेत, असे सांगत यासाठी अंगावर केसेस घ्याव्या लागल्या तरी चालेल, पक्ष त्याची काळजी घेईल, असे पवार म्हणाले. राज्य सरकारने शाळांचे समायोजन करण्यासाठी काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंत्राटी नोकरभरतीत आरक्षण नाही. त्यामुळे या धोरणाला विरोध केला पाहिजे. १ जानेवारी ते ३१ मे २०२३ या काळात राज्यात १९ हजार ५५३ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या. हा प्रश्न गंभीर असून, यावरही आवाज उठवण्याचे आवाहन पवार यांनी केले.
...तर पहिला हार मी घालीन : सुप्रिया सुळे
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालायला मी जाईन, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०२४ मध्ये पाच वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः दादाला पहिला हार घालायला जाईन. का नाही जाणार... भाऊ पहिला माझा आहे. नंतर त्यांचा हक्क आहे, असे सुप्रिया म्हणाल्या.