पर्यटनाचे ‘टेक ऑफ’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमांचा शुभारंभ; मेक माय ट्रिप अन् स्काय-हायशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:42 AM2021-08-18T08:42:15+5:302021-08-18T08:42:37+5:30

tourism : राज्याच्या पर्यटन क्षेत्राने एकप्रकारे ‘टेक ऑफ’ घेतले. पर्यटन विभागाच्या विविध उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास  ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘Take off’ of tourism, launch of initiatives at the hands of the Chief Minister; Make My Trip and Sky-High Agreement | पर्यटनाचे ‘टेक ऑफ’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमांचा शुभारंभ; मेक माय ट्रिप अन् स्काय-हायशी करार

पर्यटनाचे ‘टेक ऑफ’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमांचा शुभारंभ; मेक माय ट्रिप अन् स्काय-हायशी करार

Next

मुंबई : एमटीडीसीच्या नवीन संकेतस्थळाचा प्रारंभ, सिंहगड येथील नूतनीकृत पर्यटक निवासाचे उद्घाटन आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. मेक माय ट्रिप, स्काय-हायसह विविध संस्थांसोबत सामंजस्य करारही झाले. राज्याच्या पर्यटन क्षेत्राने एकप्रकारे ‘टेक ऑफ’ घेतले. पर्यटन विभागाच्या विविध उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास  ठाकरे यांनी व्यक्त केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘मेक माय ट्रिप’ आणि ‘गोआयबिबो’ या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग हा साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हायसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अ‍ॅस्टरडॅमच्या टुलीप गार्डनच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील कास पठारावर पर्यटन करता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.  पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, असे उपमुख्यमंत्री पवार या वेळी म्हणाले. 

उदय सामंत म्हणाले, गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल. 
आदित्य ठाकरे म्हणाले, कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजूर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

पर्यटन विभागाच्या प्रधान 
सचिव वल्सा नायर-सिंह यांनी विविध उपक्रमांची माहिती देऊन येत्या काळात पर्यटनातून आर्थिक उलाढाल वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: ‘Take off’ of tourism, launch of initiatives at the hands of the Chief Minister; Make My Trip and Sky-High Agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.