छळ करणाऱ्या पित्याला ताब्यात घ्या हो...
By admin | Published: December 22, 2016 10:41 PM2016-12-22T22:41:09+5:302016-12-22T22:41:09+5:30
एक १७ वर्षीय मुलगी चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांसोबत गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यात आली
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - एक १७ वर्षीय मुलगी चाइल्ड हेल्पलाइनच्या सदस्यांसोबत गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यात आली आणि तिने पोलिसांकडे छळ करणाऱ्या मद्यपी पित्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची विनंती केली. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत, तिला पित्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मोठी उमरी परिसरात एक १७ वर्षीय मुलगी तिच्या लहान बहिणी व आजीसह राहते. काही वर्षांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. ही मुलगी व तिची आजी तिच्या बहिणींचे पालनपोषण करतात. ही मुलगी गुणवंत विद्यार्थिनी असून, ती एका महाविद्यालयात कसेबसे शिक्षण घेते. या मुलीचे वडील मद्यपी असून, कोणतेही काम करीत नाहीत. उलट दारू पिण्यासाठी या मुलींनाच ते पैसे मागतात आणि सातत्याने त्यांचा छळ करतात. त्यांना अमानुष मारहाण करतात. अश्लील शिवीगाळ करून त्यांना मारहाण करतात.
या निर्दयी पित्याच्या वागणुकीला या मुली कंटाळल्या आहे. पिता मारहाण करीत असल्यामुळे मुलीच्या लहान बहिणीसुद्धा तिच्या आजीच्या पाठिशी लपतात. पित्याचा अत्याचार असह्य झाल्यामुळे या मुलीने चाइल्ड हेल्पलाइनच्या दूरध्वनी क्रमांकावर साधून आपली आपबिती सांगितली आणि पित्याच्या अत्याचारातून सुटका करण्याची विनंती केली. चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला सदस्य मुलीच्या घरी गेले आणि तिला गुरुवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घेऊन आले. या ठिकाणी मुलीने ठाणेदार अन्वर शेख यांच्यासमोर पित्याच्या अत्याचाराची आपबिती कथन केली. तिची आपबिती ऐकून ठाणेदारांनासुद्धा गहिवरून आले होते आणि तिला पित्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुलीने पित्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.