‘टेकआॅफ’ की नव्या समस्यांचे ‘लँडिंग’?
By admin | Published: October 17, 2016 01:19 AM2016-10-17T01:19:43+5:302016-10-17T01:19:43+5:30
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे.
बी. एम. काळे,
जेजुरी- पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार ही विकासाची मोठी संधीच चालून आलेली आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्याचे जागतिक महत्त्व अधोरेखित होणार आहे. मात्र, विमानतळ होणार, याच घोषणेने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे या पुढील काळात विमानतळ विषयामध्ये एक सुस्पष्ट पारदर्शकता आणि नियोजनबद्ध प्रस्ताव आखणी गरजेचा आहे. विमानतळाचे टेकआॅफ होताना नव्या समस्यांचे ह्यलँडिगह्ण होणार नाही, याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने विमानतळसंदर्भातील वस्तुस्थिती येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसामोर मांडणे गरजेचे बनले आहे. विमानतळासाठी नेमकी किती जमीन लागणार आहे. तिचे भूसंपादन नेमके कसे केले जाणार आहे. यातून ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्यांना नेमका किती व कोणता फायदा होणार आहे, हे याच विभागाने सक्षम अधिकारीमार्फत मांडणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ राजकारण आणि गैरसमाजातून आलेली संधी हुकण्याची आणि विमानतळाला विरोध वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच सात गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा ही या विरोधाची नांदी म्हणावी लागेल. इंचभरही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे.
>ढवळले राजकीय वातावरण
तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे विमानतळ मीच आणल्याच्या अविर्भावात येथील शेतकऱ्यांना तारांकित हॉटेल्सची स्वप्ने दाखवत आहेत. अशातच जमिनी खरेदी-विक्री दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. जमीनमालकांची भाषाही बदलली आहे.
>जागेचा निर्णय अधांतरी
पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातून आता पुरंदर तालुक्यात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. तालुक्यात हे विमानतळ कोठे होणार आहे, हे मात्र अजूनही अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही. केंद्रीय नागरी विमान
वाहतूक विभागाने तालुक्यातील तीन ठिकाणचा सर्वे केला
आहे.
यात पारगाव परिसर, राजेवाडी, आंबळे परिसर आणि रिसेपिसे, राजुरी परिसर येथील पाहणी केली होती. जेजुरी परिसराची पाहणी केल्याची चर्चा होती.
यापैकी सोयीची जागा विमान वाहतूक विभागाकडून नक्की होणार आहे. ती अजून नक्की झालेली नाही. याबाबत तालुका महसूल विभागाकडेही कोणतीच अधिकृत माहिती नाही.
>धास्ती कायम
राजेवाडी : पुरंदर तालुक्यातील सात गावात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आंतरराष्टीय विमानतळ उभारला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे, असे राजेवाडीचे माजी सरपंच रामदास जगताप व आदर्श शेतकरी विलास कडलग यांनी सांगितले. राजेवाडी, आंबळे, वाघापुर, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपुर या सात गावातील सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
सातही गावातील शेतकरी महिलांनी विरोध केला होता त्या वेळी शिवतारे यांनी तुमचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही असे सांगितले होते तरी सुध्दा विमानतळाबाबत ते आग्रही का असा सवालही जगताप यांनी केला.
आमची घरे जाळून तालुक्याचा विकास करु नका आम्हाला फक्त पुरंदर उपसाचे नियमित पाणी द्या आमच्या गावांचा विरोध कायम राहणार असल्याचे विलास कडलग यांनी सांगितले.
>जिवापाड जपलेल्या जमिनींचे काय?
पुणे जिल्ह्यात पुरंदरने कायमस्वरूपी दुष्काळाचे चटके अनुभवले आणि सोसले आहेत. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यात विमानतळ होणे हे खरोखरंच पुरंदरचे भाग्य समजावे लागेल. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही जिवापाड जपलेल्या जमिनी देऊन येथील शेतकऱ्यांचे भविष्य काय? हा प्रश्न मात्र पुरंदरकरांसमोर आहे. पुरंदर जागतिक दळणवळणाचे एक केंद्र बनणार असले, तरी ज्यांच्यामुळे हे होणार आहे, त्यांचा विचार सर्वप्रथम होणार का? हा प्रश्न अद्याप तरी अधांतरी आहे.