डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान!

By संतोष आंधळे | Published: May 15, 2023 10:45 AM2023-05-15T10:45:23+5:302023-05-15T10:45:53+5:30

गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

Taking a doctor's appointment be careful | डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान!

डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेताय, सावधान!

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांत रुग्णांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहेत. रुग्ण थेट डॉक्टरांची किंवा रुग्णालयात ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्यासाठी वेबसाइटवरून बुकिंग करतात, तेव्हा रुग्णांना हजारो रुपयांचा गंडा घातला जाताे. 

गुगलवरील ठगांमुळे वडाळा येथील वकील महिलेला रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सव्वा लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढवली. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

काही दिवसांपूर्वी कांदिवली येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मीरा रोड येथील रुग्णालयात ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करताना ९७ हजार रुपयांना चुना लागला.

कशी होते फसवणूक -
रुग्णालयाच्या डुप्लिकेट वेबसाइट बनविल्या जातात. त्यामध्ये गुन्हेगार आपली स्वतःची माहिती देऊन रुग्णांकडून पैसे उकळतात.

रुग्ण गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधून अपॉइंटमेंट घेतात. अपॉइंटमेंट बुक केल्याचे सांगून ५ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले जाते. व्हॉटस्ॲप क्रमांकावर टोकन क्रमांक ३ असा मेसेज पाठवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर ठगाने पाठविलेल्या लिंकनुसार व्यवहार केले जातात. 

हे खूप गंभीर आहे. या अशा स्वरूपाच्या दोन घटना आमच्याकडे घडल्या आहेत. त्या आम्ही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. आम्ही जनजागृती अभियान राबवत आहोत. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा वापर करून आमच्या रुग्णालयाची वेबसाईट कशी दिसेल, यासाठी प्रयत्न करत असतो. रुग्णांनीसुद्धा अपॉइंटमेंट घेताना सतर्क राहण्याची गरज आहे.  
- जॉय चक्रवर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंदुजा हॉस्पिटल

रुग्णांची फसवणूक होते याबद्दल आम्हाला कल्पना आहे. मात्र, आमची आयटीची टीम आमच्या वेबसाइटवर सातत्याने लक्ष ठेवून असते. कुणीही रुग्णालयाची साइट हॅक करू शकत नाही. विशेष म्हणजे आम्ही आमच्या वेबसाइटमध्ये आणखी बदल करणार असून, त्यावर सध्या काम सुरू आहे. लवकरच पूर्ण वेबसाइट तुम्हाला बदललेली दिसेल.

- विवेक तलवलीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल हॉस्पिटल

Web Title: Taking a doctor's appointment be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.