तलाठी भरती: पेपर घेताय की ‘परीक्षा’? सर्व्हर डाऊनमुळे सर्व पेपरना दाेन तास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:58 AM2023-08-22T06:58:14+5:302023-08-22T06:58:35+5:30

शासनाकडून दिलगिरी, विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

Taking a paper or an 'exam'? | तलाठी भरती: पेपर घेताय की ‘परीक्षा’? सर्व्हर डाऊनमुळे सर्व पेपरना दाेन तास उशीर

तलाठी भरती: पेपर घेताय की ‘परीक्षा’? सर्व्हर डाऊनमुळे सर्व पेपरना दाेन तास उशीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तलाठी भरती जाहीर झाल्यापासून भरती प्रक्रियेतील घोळ संपता संपेनात. आधी वाढीव शुल्क, त्यानंतर दूरची केंद्र, नाशिक येथील केंद्रावर घडलेला कॉपीचा प्रकार हे सगळे घोळ सुरू असतानाच सोमवारी परीक्षा तांत्रिक कारणामुळे दोन तास उशीरा सुरू झाली आणि त्याचा मनःस्ताप परीक्षार्थींना सोसावा लागला. 
राज्यातील ३० जिल्ह्यात ११५ केंद्रांवर सोमवारी तलाठी भरती परीक्षेचे नियोजन होते. टीसीएस कंपनीकडे परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सकाळी पहिल्या सत्रात ९ ते ११ वाजता ऑनलाईन परीक्षा होणार होती. त्यानुसार परीक्षार्थी वेळेच्या आधी केंद्रावर पोहचले. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंंटर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही. अखेर प्रशासनाकडून परीक्षा दोन तास उशीरा सुरू होईल असा निरोप देण्यात आला. त्यानुसार ९ ची परीक्षा ११ वाजता सुरू झाली. पुढील दोन सत्रातील परीक्षाही दोन तास उशीरा सुरू झाली.

शासनाकडून दिलगिरी

तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनःस्तापाबद्दल शासनाच्या वतीने तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच परीक्षार्थींनी सहकार्य करावे अशी विनंतीही केली आहे.

विद्यार्थी-पालकांमध्ये संताप 

  • नागपूर : प्रत्येक सत्रात दोन तास उशीर. तिसऱ्या सत्राचा ४ चा पेपर ६:३० ला सुरू झाला. संपायला रात्री ९ वाजले.   
  • लातूर : उमेदवारांना केंद्रावर ७:३० ला बोलावले. सर्व्हरमुळे प्रवेश नाकारल्याने उमेदवारांकडून रास्ता रोकोचा प्रयत्न केला. 
  • धुळे : विलंबामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर संताप व्यक्त केला.   
  • अकोला : उशीरा पेपर सुरू झाल्याने अनेकांमध्ये संभ्रम. 
  • छत्रपती संभाजीनगर : शहरात मुक्कामी आलेल्या विद्यार्थी पालकांनी रोष व्यक्त केला.
  • पुणे : ११६ केंद्रांवरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना फटका बसला.
  • गोंदिया : शेवटच्या सत्रातील पेपर सायंकाळी ५:५५ वाजता सुरू झाला व ७:५५ वाजता संपला. 
  • अमरावती : आठही केंद्रावर तांत्रिक बिघाड आल्याने गोंधळ उडाला.


परीक्षा चालू होण्याआधी टीसीएस कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. एक हजार रुपये शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो. ही दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा, समन्वय समिती, महाराष्ट्र

तलाठी परीक्षा प्रक्रिया सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांशी खेळ चालवला आहे. कारणे सांगून सरकार व परीक्षा घेणारे कंत्राटदार जबाबदारी झटकू शकत नाहीत. शुल्कातून १०० कोटींहून अधिकची रक्कम गोळा केली आहे, तरी परीक्षा सुरळीत का होत नाही? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Taking a paper or an 'exam'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा