समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 09:45 PM2018-10-12T21:45:43+5:302018-10-12T21:58:12+5:30

संगीत क्षेत्रातील वाटचाल, रियाझाचे संगीत साधनेतील महत्व याबाबत या क्षेत्रातील महिलांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा कट्टा अंतर्गत मनमोकळा संवाद साधला.

Taking the balance of rich tradition and innovation, 'Ti' flourished art | समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला

समृध्द परंपरा आणि नाविन्यतेचा आविष्कार यांचा समतोल साधत ‘ती’ने फुलवली कला

Next
ठळक मुद्देआपण आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा असतो. सध्याच्या काळात संगीत रंगभूमी थोडी रुसल्यासारखीमेहनतीशिवाय कोणत्याही यशाला किंमत नसते.रियाझाशिवाय उत्तम सादरीकरण होऊच शकत नाही,

पुणे : महाराष्ट्राला अभिजात संगीताची समृध्द परंपरा लाभली आहे. पूर्वसुरींनी संगीताला दिशा दिली, कलेचे जतन आणि संवर्धन केले. कलेची ही धुरा पुढील पिढी समर्थपणे सांभाळत आहे. विशेषत:, महिलांनीही या क्षेत्रामध्ये ठळक  ठसा उमटवला आहे. संगीत क्षेत्रातील वाटचाल, रियाझाचे संगीत साधनेतील महत्व याबाबत या क्षेत्रातील महिलांनी ‘लोकमत’च्या ‘ती’चा कट्टा अंतर्गत मनमोकळा संवाद साधला.

शिल्पा पुणतांबेकर : 
आमच्या घराण्याच्या रक्तातच गाणे आहे आणि वारसा माझ्याकडे संक्रमित झाला आहे. माझे पणजोबा देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्यापासूनच गाण्याची परंपरा सुरु झाली. माझे आई-वडील शैला दातार आणि सुधीर दातार यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली. आईने घर सांभाळून गाणे जपले. मीही तिच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. माझा कार्यक्रम आहे म्हणून बाहेर खाऊन या, असे आईने कधीच सांगितले नाही. घर सांभाळून, आम्हा भावंडांकडे लक्ष देत गाणे केले. तिच्या तुलनेत मला खूप कमी कष्ट पडले. कारण, माझी आई आणि सासूबाई या दोघींच्या पाठिंब्यामुळे मी गाण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. आपण आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा असतो. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगवेगळा असतो. आपली कला जपण्याची जबाबदारी आपलीच असते. त्यामुळे आयुष्यात समतोल साधणे आवश्यक असते. 

अनुराधा राजहंस : 
नारायण श्रीपाद राजहंस यांची नातसून असल्याने त्यांचे आशीर्वादच मला लाभले आहेत. त्यांनी संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. मात्र, सध्याच्या काळात संगीत रंगभूमी थोडी रुसल्यासारखी वाटते आहे. मुली वेगवेगळया क्षेत्रात स्वत:ला सिध्द करत आहेत. तरुणींनी संगीत नाटकांकडेही वळायला हवे. संगीत रंगभूमी हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि तो जपला गेला पाहिजे. बालगंधर्वांनी १९०५ साली संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. त्या काळात महिला नाटकांमध्ये काम करत नव्हत्या. अत्तराचा सुगंध सर्वत्र दरवळावा, आॅर्गनच्या सुरांनी अंग रोमांचित व्हावे, रंगभूमीवर नवेकोरे संगीत नाटक समोर यावे. अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांची परंपरा सांगणा-या संगीत नाटकाने उभारी घ्यावी आणि रंगभूमी बहरावी, असे मनापासून वाटते. बालगंधर्व संगीत रसिक मंडळीच्या माध्यमातून आम्ही संगीत नाटक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांमध्ये नव्या पिढीची साथ मिळावी आणि हा ठेवा जपला जावा, असेच वाटते. यासाठी शासनानेही संगीत नाटकांना नियमित अनुदान द्यायला हवे.
स्त्री ही अष्टभूजा आहे. ती एकाच वेळी अनेक जबाबदा-या पेलू शकते. आपण स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली पिढी आहोत. आपल्याला चांगल्या संधी, चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. महिलांनी स्वत:मधील सुप्तगुण जोपासत स्वत:चा विकास साधायला हवा. स्त्री सक्षम असल्याने ती सर्व जबाबदा-या सांभाळून स्वत:ला सिध्द करु शकते. 

आरती दिक्षित :
संगीत ही आपली समृध्द परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ती प्राणापलीकडे जपली गेली आहे. बदलत्या काळानुसार ट्रॅकवर गायली जाणारी गाणी पुढे येत आहेत. कराओके अंतर्गत एखादी गायिका अथवा एखादा गायक गाणे गातात. मात्र, यामुळे वादक मागे पडत आहेत. त्यांची मेहनत व्यर्थ जाता कामा नये. संगीत क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी संयम अत्यंत आवश्यक असतो. सध्याच्या पिढीमध्ये संयम खूप कमी प्रमाणात पहायला मिळतो. संगीत शिक्षण, रियाझावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांना सादरीकरणावर जास्त भर द्यायचा असतो. मात्र, रियाझाशिवाय उत्तम सादरीकरण होऊच शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. आई-वडिलांनीही याच दृष्टीने मुलांवर संस्कार करायला हवेत. माझा मुलगा विशेष असूनही मी माझी कारकीर्द घडवू शकले ते केवळ पतीच्या पाठिंब्यामुळे. कुटुंब हा आपला आधार असतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. 

कल्याणी देशपांडे-जोशी :
यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनतीशिवाय कोणत्याही यशाला किंमत नसते. तुमचे नाणे खणखणीत असेल तर यशाला गवसणी घालणे अवघड नाही. संगीत क्षेत्रात रियाझाला पर्याय नाही, मेहनतीलाही पर्याय नाही. वाईट लोक प्रत्येक क्षेत्रातच आहेत. मात्र, आपण सतर्क राहिलो तर कोणतीही वाईट घटना घडणार नाही. आई-वडिलांनीही कायम हीच शिकवण दिली. त्यांनी लहानपणापासून माझी गाण्यातील आवड हेरून मला कायम प्रोत्साहन दिले. 


 

Web Title: Taking the balance of rich tradition and innovation, 'Ti' flourished art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.