दहा लाखांची रोेकड घेताना ठाण्याच्या तहसीलदारासह चालकही जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:13 PM2017-10-17T22:13:24+5:302017-10-17T22:14:45+5:30
जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
ठाणे: जमीन अकृषिक दाखवून त्यापोटी कर भरण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल दहा लाखांची रोकड आपल्या चालकामार्फत स्वीकारणारे ठाणे तहसीलदार किसन भदाणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी चालकासह त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील या तक्रारदाराने आपले काम करून घेण्याकरिता भदाणे यांच्याशी एक आठवड्यापूर्वी संपर्क साधला होता. मात्र, त्यासाठी दहा लाखांच्या एकरकमी लाचेची मागणी भदाणे यांनी केली होती. याबाबत संबंधितांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ आॅक्टोबर रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांनी खात्री केली. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ही रक्कम देण्याचे ठरवून तसा सापळा लावण्यात आला.
मंगळवारी ठाणे तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच भदाणे यांच्या कारचा चालक राम उगले याला ही दहा लाखांची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारतांना पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तहसिलदारसारख्या वर्ग एकच्या अधिका-याला लाच स्वीकारतांना पकडण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.