तलाठी, मंडलाधिकाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: November 8, 2016 02:31 AM2016-11-08T02:31:47+5:302016-11-08T02:31:47+5:30
तलाठी सजाची पुनर्रचना आणि सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी तलाठी महासंघाने अनेक वेळा प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या
बोर्ली-मांडला/ मुरुड / आगरदांडा : तलाठी सजाची पुनर्रचना आणि सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करण्यासाठी तलाठी महासंघाने अनेक वेळा प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या, मात्र त्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने शेतकरी व जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जनता महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर राग व्यक्त करीत आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी तलाठी महासंघाने निषेध आंदोलन सुरू केले आहे. या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. सरकारच्या सुस्त कारभारामुळे जनतेमध्ये निराशेची लाट पसरली आहे.
गेली बत्तीस वर्षांपासून तलाठी सजांची पुनर्रचना आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाचे भाडे द्यावे, सातबारा संगणकीकरण आणि ई -फेरफारमधील येणाऱ्या अडचणी, व सर्व्हर स्पीड तसेच नेट कनेक्टिव्हिटी आदि भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात, तलाठी व मंडलाधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौणखनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी मंडलाधिकारी कार्यालये बांधावीत, मंडलाधिकारी यांना कार्यालयीन भाडे मंजूर करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहेत. ३ नोव्हेंबरपासून तालुक्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी आपापले कार्यालय बंद करून मुरुड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु के ले. (वार्ताहर)
म्हसळा तालुक्यात आंदोलनाला उत्तम प्रतिसाद
म्हसळा : संपूर्ण राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी व पटवारी मंडल अधिकारी समन्वय महासंघ तालुका म्हसळा यांच्या वतीने तहसील कार्यालय म्हसळा येथे सोमवारपासून सकाळी १० ते कार्यालयीन वेळेपर्यंत तलाठी व मंडल अधिकारी यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाची सुरुवात तालुका अध्यक्ष के.एस. देऊळगांवकर आणि एस.के. शहा यांच्या नेतृत्वाखाली झाली. पहिल्याच दिवशी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
मागण्यांमध्ये प्रामुख्याने तलाठी सजा व महसूल मंडळाची पुनर्रचना, ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफारमधील सॉफ्टवेअर दुरु स्ती, सर्व्हर वेग, नेट कनेक्टिव्हिटी आदीबाबतच्या अडचणी दूर करणे, पायाभूत प्रशिक्षण, अवैध गौणखनिज वसुली कामातून तलाठी संवर्गाला वगळणे, तलाठी-मंडल अधिकारी यांना स्वतंत्र कार्यालये बांधून कार्यालयीन भाडे मंजूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. याच मागण्यासाठी पालकमंत्री, खासदार व आमदारांच्या गाठीभेटी घेण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत राज्यस्तरीय बंद पुकारण्यात येणार असल्याचे एस.के. शहा यांनी यावेळी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
आंदोलनामुळे उरण तहसीलचे काम ठप्प
उरण : मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील तलाठी, सर्कल आदी कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलनाला सुरुवात केली. राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या उरणमधील १७ तलाठी आणि सर्कल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उरणमध्येही सुरू झालेल्या तलाठी वर्गाच्या आंदोलनामुळे उरण तहसीलचे काम ठप्प झाले आहे. विविध कामांसाठी तहसील, तलाठी कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांवर काम न झाल्याने माघारी परतण्याची पाळी आली.
मागील अनेक वर्षांपासून राज्यातील तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित माहिती तलाठी संघटना उरण शाखेचे अध्यक्ष के. पी. मोहिते, उपाध्यक्ष डी. एन. पवार यांनी दिली. आजपासून सुरू झालेले तलाठ्यांचे आंदोलन १० ते १६ तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने तर मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुढे बेमुदत सुरू राहणार आहे, अशी माहिती दिली. उरण शाखेच्या आंदोलनामुळे तळा कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला असल्याची माहिती उरण तहसीलदार कविता गोडे यांनी दिली. (वार्ताहर)
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाडमध्ये तलाठी संघटनेचे धरणे
महाड : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाडमध्ये सोमवारी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष ए. टी. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सचिव गोरोबा तोडकरी, ए. टी. वाघमारे, एच. डी. हेंगळे, संदेश पानसरे, एस. जे. सोनावणे, डी. बी. जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
तलाठी सजाची व महसूल मंडलांची पुनर्रचना करावी, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करणे, अवैध गौण खनिज वसुलीच्या कामातून तलाठी कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावेत, मंडल अधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करावे, पूर्वीची निवृत्ती योजना अमलात आणावी, अव्वल कारकून व मंडल अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत आदि प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महत्त्वाची कामे रखडल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. (वार्ताहर)
श्रीवर्धनमध्ये शेतकरी, नागरिकांची गैरसोय
सातबारा उतारा व ई-फेरफार संगणकीकरण प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर करून अद्ययावत व्यवस्था पुरवणे, सर्व्हर स्पीड नेट कनेक्टिव्हिटीसह अन्य विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयासमोर सोमवारी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडून निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या वतीने शासनाकडे विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करून वेळोवेळी निवेदन देत आंदोलने छेडण्यात आली मात्र शासनाकडून सातबारा उतारा व ई फेरफार संगणकीकरण प्रणालीत असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संदर्भात कोणतीच ठोस पावले उचलली जात नसल्याने एकूण पाच टप्प्यात हे आंदोलन सुरू झाले असून दि. ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्यात आले तर आज एक दिवसाचे धरणे आंदोलन धरून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
१ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते यांना आंदोलनाची दखल घेऊ न मागण्या मान्य न केल्यास १६ नोव्हेंबरपासून तलाठी, मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून हे बेमुदत सामूहिक रजेवर जातील असा इशारा राज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.