तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच हाेणार; सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना २०० पेक्षा अधिक गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:00 PM2024-01-09T12:00:12+5:302024-01-09T12:00:24+5:30

तलाठी परीक्षेत अनियमितता झाल्याच्या चर्चेनंतर सरकारचे स्पष्टीकरण

Talathi recruitment process will be based on merit only; Explanation of Govt | तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच हाेणार; सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना २०० पेक्षा अधिक गुण

तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच हाेणार; सामान्यीकरण प्रक्रियेमुळे काहींना २०० पेक्षा अधिक गुण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तीन भागांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेस महाराष्ट्रातून १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवरील उत्तरांबाबतच्या शंकांचे निरसन आयसीपीएस कंपनीने केले असून, ही तलाठी भरती मेरिटनुसारच होईल. याविषयीची मेरिट लवकरच जाहीर केले जाईल, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.

सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण, जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत, त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थ्याच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती

राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू, अशा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. याबाबत मंत्री विखे-पाटील म्हणाले की, राज्यात ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. त्यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण २०० पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या, त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे. गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरिटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल.

तलाठी भरती परीक्षेत ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात, असाही खुलासा प्रभारी 
राज्य परीक्षा समन्वयकांकडून करण्यात आला आहे.

Web Title: Talathi recruitment process will be based on merit only; Explanation of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा