तळेगावात अपघात; दोन जखमी
By Admin | Published: August 2, 2016 02:00 AM2016-08-02T02:00:11+5:302016-08-02T02:00:11+5:30
चालकाच्या डोळ्यावर वाहनाच्या हेडलाइटचा तीव्र प्रकाशझोत पडल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
तळेगाव दाभाडे : चालकाच्या डोळ्यावर वाहनाच्या हेडलाइटचा तीव्र प्रकाशझोत पडल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजक तोडून ट्रेलरने कंटेनरला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
हा विचित्र अपघात तळेगाव-चाकण रस्त्यावर येथील सेवाधाम हॉस्पिटलसमोर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने वेगळी करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र यामध्ये कालावधी जास्त गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
गोविंद कल्लू यादव (वय २८, उत्तर प्रदेश) व महंमद इप्तिहार अब्दुलहबीब शेख (वय ३०, रा. न्हावाशेवा, ता. उरण, जि. रायगड) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. चाकणहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ६०९९) व लोखंडी कॉईल घेऊन विरुद्ध दिशेने जाणारा ट्रेलर (एमएच १४ ईएम ४७५२) तळेगाव स्टेशनजवळील सेवाधाम हॉस्पिटल येथे आले असता तीव्र प्रकाशझोत डोळ्यावर पडल्याने यादव यांचा वाहनावरील ताबा सुटला. दुभाजक तोडत ट्रेलर समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळला. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. शेख यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. गोविंद यादव हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास पोलीस नाईक दीपक काटे करीत आहेत. (वार्ताहर)
>सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अपघातानंतर होणाऱ्या वाहतूककोंडीचाही प्रवाशांना अनेकदा सामना करावा लागतो. या संदर्भात उपाययोजनांची मागणी होत आहे.