किस्से, कहाण्यांमधून पवारांचा यशोमंत्र
By admin | Published: January 11, 2016 02:41 AM2016-01-11T02:41:52+5:302016-01-11T02:41:52+5:30
अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला.
सांगली : अनेक किस्से, कहाण्यांचा अनुभव कथन करीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी सांगलीत कोणत्याही क्षेत्रात कसे यशस्वी होता येते, याचा मंत्र दिला. सांगलीची रेश्मा पाटील, कऱ्हाडचे डांगे आणि उस्मानाबादच्या देशमुखांच्या विदेशातील कर्तृत्वाचा प्रवास मांडताना संकटांवर मात करा आणि यशस्वी व्हा, असा सल्ला त्यांनी दिला.
येथील एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी आणि संकटावर मात करण्याची हिम्मत असेल तर, तुम्हाला यशापासून कुणीही रोखू शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीत यशाचे शिखर गाठणारे लोक अनेकदा भेटले. त्यांच्या कहाण्या ऐकून मीही थक्क झालो.
इंग्लंडदौऱ्यात असताना एका भारतीय हॉटेलमध्ये मी जेवणासाठी गेलो होतो. त्यावेळी जेवणाच्या ताटाबरोबर चार तळलेल्या मिरच्याही ठेवल्या गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. ‘या मिरच्या इथे कोणी ठेवल्या’, असा सवाल मी केला. त्यावर एक तरुणी त्याठिकाणी आली आणि तिनेच त्या मिरच्या ठेवल्याचे सांगितले. आपल्याकडील लोकांना तळलेल्या मिरच्या तोंडाला लागल्याशिवाय जेवणाची चव लागत नाही, असे तिने सांगितले. रेश्मा पाटील असे तिचे नाव होते. ती सांगलीतील होती. पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिने या हॉटेलमधील नोकरी स्वीकारली होती.
कऱ्हाडमधील डांगे नावाचे एक गृहस्थही न्यूयॉर्कला भेटले. ते मराठीतच बोलत होते. त्यांचे घर लांब असल्याने माझ्या कार्यक्रमातून वेळ काढून तेवढ्या लांब जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट जेव्हा त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी विमान पाठवून देऊ का, असे विचारले. मला धक्काच बसला. तुमचा उद्योग तरी काय आहे? असे त्यांना मी विचारले. अमेरिकन एअरफोर्सला लागणारे स्पेअर पार्टस् बनविणाऱ्या कंपनीचे ते मालक होते. कऱ्हाडमधील साधा माणूस अमेरिकेत भली मोठी कंपनी उभी करू शकत असेल तर, कोणालाही ही गोष्ट साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले.