रात्रीतून चार तास चर्चा अन् सकाळी सुटले उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:14 AM2023-09-15T09:14:01+5:302023-09-15T09:15:26+5:30
Maratha Reservation: जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या.
जालना - जीआर काढला, त्यात दुरुस्ती केली तरी मागण्या मान्य होत नसल्याने अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घ्यायला तयारच नव्हते. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे यांनी गुरुवारी पहाटे जवळपास चार तास जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
सर्वपक्षीयांच्या बैठकीनंतर जरांगे यांनी पाच अटी ठेवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी मुख्यमंत्री येणार होते. परंतु, बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, आ. नारायण कुचे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. त्यांनी जरांगे पाटील आणि शिष्टमंडळातील सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली.
शासनाने घेतलेले निर्णय आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या यात कोणता फरक आहे आणि त्यावर तोडगा कसा काढायचा यासाठी आम्ही बुधवारी मध्यरात्री मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. चर्चेबाबत मध्यरात्री २ वाजताच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माहिती दिली होती.
- रावसाहेब दानवे,
केंद्रीय राज्यमंत्री
रात्री काय काय घडले?
रात्री १२ वाजता - ग्रामपंचायतमध्ये बंद दाराआड चर्चा
रात्री १ः०५ वाजता - बंद दाराआड चर्चा संपवून जरांगे यांचे शिष्टमंडळ व आमदार नारायण कुचे उपोषणस्थळी. तिथे पुन्हा जवळपास ३५ मिनिटे चर्चा
रात्री १:४० वाजता - आमदारांसह शिष्टमंडळ पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात
पहाटे २:३० वाजता - सगळे जण पुन्हा उपोषणस्थळी. तिथे दानवे यांनी एक चिठ्ठी जरांगे यांना दाखवली व पुन्हा खिशात टाकली. त्या चिठ्ठीचा फोटो गिरीश महाजन यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये काढून घेतला.
पहाटे ३ वाजता - चर्चा संपली.
सकाळी १०:४५ वाजता - मुख्यमंत्री अंतरवाली सराटीत दाखल.