महिला पोलीस, सहका-यांशी सभ्यतेने बोला, वरिष्ठ अधिका-यांना पोलीस आयुक्तांची तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:27 PM2017-10-08T21:27:03+5:302017-10-08T21:27:24+5:30
आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहकारी अधिकारी, अंमलदारांशी सौजन्य व सभ्यतेने वागावे, अन्यथा त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे.
मुंबई : आपल्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले सहकारी अधिकारी, अंमलदारांशी सौजन्य व सभ्यतेने वागावे, अन्यथा त्याबाबत तक्रार आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. विशेषत: महिला अधिकारी, पोलिसांशी संभाषण करताना विशेष खबरदारी बाळगण्याची सूचना दिली आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अप्पर आयुक्त, उपायुक्त, उपअधीक्षक, वरिष्ठ निरीक्षक हे आपल्या कनिष्ठ सहका-यांशी संभाषण करताना अधिकार गाजवित मग्रुरी, अरेरावी, शिवराळ भाषा वापरतात, विशेषत: महिला अधिकारी, कर्मचा-यांशी अश्लील व शिवराळ भाषा वापरतात. त्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळूनही शिस्तीच्या बडगा व आणखी त्रास होण्याच्या भीतीमुळे त्याबाबत उघडपणे तक्रार करीत नाहीत. मात्र त्यामुळे संबंधितांचे मानसिक खच्चीकरण झाल्याने काम करताना अडचणी निर्माण होतात. ही बाब निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्तांनी आपल्या कनिष्ठ सहकारी, महिला अधिकारी, अंमलदारांशी सौजन्याने बोलण्याचे फर्मान बजाविले आहे.
----------
सोशल मीडियावरील पोस्टचा परिणाम
घाटकोपर वाहतूक नियंत्रण शाखेतील वरिष्ठ निरीक्षक उबाळे हे एका महिला पोलिसांशी अंत्यत शिवराळ भाषेत संभाषण करीत असल्याची एक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाली आहे. त्याबाबत संबंधितांवर काहीच कारवाई न झाल्याने एका अंमलदाराने ती फेसबुक व व्हॉटस्अपवरून व्हायरल केली. त्यानंतर उबाळे यांना कारणे दाखवा नोटीस तसेच वरिष्ठांनी सहका-यांशी सभ्यपणे बोलण्याचे फर्मान आयुक्तांनी बजाविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.