कुटुंबातील संवाद वाढवूनच ‘ब्लू व्हेल’पासून मिळेल मुक्ती, सायबर गुन्हेगारीतज्ज्ञ दीप्ती सुतारिया यांच्याशी बातचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 02:03 AM2017-09-10T02:03:32+5:302017-09-10T02:03:45+5:30

नव्या पिढीतील मुलांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइलचा वापर उपकारक ठरत आहे; पण मोबाइलचा अतिरेकी वापर, तोसुद्धा ज्येष्ठांच्या देखरेखीविना घातक ठरू शकतो. मोबाइलवरील खेळ खेळताना आपल्या देशात दहा मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.

Talking to the cyber criminals, Deepti Sutariya, getting relief from 'blue whale' by expanding family dialogue | कुटुंबातील संवाद वाढवूनच ‘ब्लू व्हेल’पासून मिळेल मुक्ती, सायबर गुन्हेगारीतज्ज्ञ दीप्ती सुतारिया यांच्याशी बातचीत

कुटुंबातील संवाद वाढवूनच ‘ब्लू व्हेल’पासून मिळेल मुक्ती, सायबर गुन्हेगारीतज्ज्ञ दीप्ती सुतारिया यांच्याशी बातचीत

Next

अकोला : नव्या पिढीतील मुलांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मोबाइलचा वापर उपकारक ठरत आहे; पण मोबाइलचा अतिरेकी वापर, तोसुद्धा ज्येष्ठांच्या देखरेखीविना घातक ठरू शकतो. मोबाइलवरील खेळ खेळताना आपल्या देशात दहा मुलांना प्राण गमवावे लागले आहेत. सायबर गुन्हेगारी विशेषज्ञ अ‍ॅड. दीप्ती सुतारिया यांच्याशी शैलेंद्र दुबे यांनी या विषयावर साधलेला संवाद.

प्रश्न - ‘ब्लू व्हेल’ या खेळाची आव्हाने कोणती?
उत्तर - फिलीप बुडीकेन या २१ वर्षीय तरुणाने निराशावस्थेत ‘ब्लू व्हेल’ खेळ निर्माण केला आहे. या ‘लिंक’शी आपण संपर्क केल्यावर तुम्हाला ५० कामे देण्यात येतात. एकेक काम पूर्ण करीत अखेरच्या टप्प्यावर व्यक्तीला मानसिकदृष्ट्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते. कुटुंबात परस्पर संवादाचा अभाव असेल तर, मुले या खेळाच्या जाळ्यात अडकतात, असे दिसून आले आहे.
प्रश्न - ‘ब्लू व्हेल’च्या चक्रव्यूहात मूल अडकले आहे, हे कसे ओळखावे?
उत्तर - या खेळाच्या जाळ्यात अडकलेला मुलगा अबोल बनतो. त्याला एकटे राहणे आवडू लागते. तो विनाकारण चिडचिड करू लागतो. कधी-कधी तो आक्रमक होताना दिसतो. अशा मुलाकडे लक्ष देऊन त्याला योग्य मार्गावर आणावे लागते, अन्यथा तो ताब्यात राहात नाही.
प्रश्न - अशा मुलांच्या सुरक्षेसाठी कोणती पावले उचलावीत?
उत्तर - यासंदर्भात मी महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांना पत्र पाठवून या खेळावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सीबीएसईने या विषयावर कार्यशाळा घेण्याची सूचना शाळांना केली आहे, पण मातांनीच याबाबतीत जागरूक राहून आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे.
प्रश्न - शालेय विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार माता-पित्यांना यासंदर्भात कसे प्रशिक्षित करता येईल?
उत्तर - शाळांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात. कार्यशाळेत सायबरतज्ज्ञ आणि सायबर सायकॉलॉजिस्ट हेही असणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत ‘ब्लू व्हेल’च्या धोक्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात येईल आणि मानसिकदृष्ट्या या संकटाचा सामना करण्याचे उपाय सांगण्यात येतील. लंडनचे सायबर सायकॉलॉजिस्ट डॉ. जॉन सुलर यांचेही साह्य घेता येईल; कारण ते आमच्या केंद्राशी जुळलेले
आहेत.
प्रश्न - मुले आणि पालक यांच्यातील दूराव्यामुळे हा प्रकार वाढला आहे का?
उत्तर - निश्चितच. माता-पिता अन्य कामात व्यग्र राहून मुलांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलेही स्वत:च्या मार्गाची निवड करतात. त्यातून कुटुंबात असे प्रश्न निर्माण होतात. हे अंतर कमी करण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण करण्याची गरज आहे.
प्रश्न - मुले आत्महत्या करतात, त्यात पालकांची जबाबदारी किती?
उत्तर - या स्थितीसाठी कुणा एकावर दोषारोपण करणे योग्य होणार नाही. पण पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर बारीक नजर ठेवायला हवी. या खेळात मुले आपल्या हातापायावर खुणा करतात, असे दिसून आले आहे. तेव्हा त्याकडे पालकांनी लक्ष पुरवावे.
प्रश्न - हा विज्ञानाचा दुरुपयोग नव्हे काय?
उत्तर - हा घातकी खेळ विज्ञानाच्या दुरुपयोगातूनच निर्माण झाला आहे. वास्तविक मानवाच्या सकारात्मक विकासासाठी विज्ञान वापरले गेले पाहिजे. पण मुलांना मिळणाºया स्वातंत्र्याचे नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. पोर्नोग्राफी हे त्याचे एक उदाहरण आहे.
प्रश्न - विज्ञानाच्या दुष्परिणामांबद्दल सरकारने काय पाऊल उचलले आहे?
उत्तर - कोणतेच नाही. ब्लू व्हेलच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने फेसबुक, गुगल इत्यादींना नोटीस जारी केली आहे. त्या पलीकडे सरकारने काहीच केलेले नाही. वास्तविक या खेळावर सरकारने बंदी घातली पाहिजे.
प्रश्न - सायबरतज्ज्ञ या नात्याने आपण काय सल्ला द्याल?
उत्तर - सर्वप्रथम कुटुंबात परस्पर संवादाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे. मुलांसाठी त्यांनी अधिक वेळ दिला पाहिजे. कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी महिलांची असते. ती त्यांनी पार पाडली पाहिजे. सरकारनेही कठोर पावले उचलायला हवीत.
प्रश्न - माहिती तंत्रज्ञानाने या संदर्भात काही कायदे केले आहेत का?
उत्तर - सरकारने याबाबत केलेले कायदे अपुरे आहेत, माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्यात ९० कलमे आहेत. पण अनेक विषयांना कायद्याने स्पर्श केलेला नाही. संगणकाच्या वापरासंबंधी कायदे नाहीत. तसेच आॅनलाइन गेम्स हे कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. सायबर गुन्हे हाताळण्यासाठी सायबर पोलीस चौकी आणि सायबर कोर्टही आवश्यक आहे. सायबर गुन्ह्यांशी संबंधित कायद्यांचे समीक्षण करून त्यात सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे.

प्रश्न - तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होत असेल तर या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे भविष्य काय?
उत्तर - तंत्रज्ञानाचा होणारा अयोग्य वापर मुलांना चुकीच्या दिशेने नेऊ शकेल. ब्लू व्हेलसारख्या घातक खेळांशिवाय हॅकिंग, मनी लॉन्ड्रिंग हेही विज्ञानाच्या दुरुपयोगातून होत असते. ही स्थिती मुलांसाठी घातक ठरू शकते. तंत्रज्ञानाचा यात उपयोग केला तर मुलामधून स्टीव्ह जॉब्ज आणि बिल गेटस् निर्माण होतील. तंत्रज्ञानाचा चांगला वापर ही कुटुंब, समाज आणि सरकारची संयुक्त जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Web Title: Talking to the cyber criminals, Deepti Sutariya, getting relief from 'blue whale' by expanding family dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.