शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात रंगला कलगीतुरा, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 06:19 AM2017-11-26T06:19:55+5:302017-11-26T06:20:20+5:30
राज्यामध्ये सत्तेत एकत्र असूनही शिवसेना नेते सातत्याने भाजपावर टीका करीत असून, प्रत्यक्षात बाहेर पडायला तयार नसल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला.
कोल्हापूर/ क-हाड : राज्यामध्ये सत्तेत एकत्र असूनही शिवसेना नेते सातत्याने भाजपावर टीका करीत असून, प्रत्यक्षात बाहेर
पडायला तयार नसल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकोलमध्ये अडकले असल्याचा शेरा त्यांनी मारला, तर दुस-यांचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधी
लागतोय, याची शरद पवार नेहमी वाट पाहत असतात, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना
सुनावले.पवार आणि ठाकरे हे दोघेही नेते शनिवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर होते. या वेळी दोघांच्यात रंगलेला कलगीतुरा कार्यकर्त्यांच्या चर्चेचा विषय झाला होता.
शरद पवार म्हणाले, जर नांदायचे नसेल तर सत्तेतून वेगळे व्हा. याला कोल्हापुरातील शिरोळ येथे बोलताना ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले. दुस-याचा संसार केव्हा मोडतोय आणि आपला नंबर कधी लागतोय याचीच वाट पवार पाहत आहेत. त्यांना वाटतंय म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
उद्या राज्यात शिवसेनेचे सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला. क-हाडमध्ये बोलताना पवार म्हणाले की, मी पन्नास वर्षे सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करतोय; पण सत्तेत राहायचं आणि मित्रपक्षाच्या विरोधातच आंदोलने करत बोलायचं, असं मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असं मी यापूर्वीही बोललो होतो. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकोलमध्ये अडकलेत.