MIM सोबत मविआशी चर्चा, ठाकरे गटाला युती मान्य?; जलील यांच्या विधानानं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:23 PM2024-09-12T12:23:20+5:302024-09-12T12:24:52+5:30
अंबादास दानवे छोटे नेते, त्यांना मी मुंबईत कुणाला भेटलो, कुठल्या हॉटेलला चर्चा झाली हे माहिती नसावं असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगर - महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत युतीबाबत चर्चा सुरू असल्याचं विधान करून एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र मविआच्या कुठल्या नेत्यांशी चर्चा केली, आमच्यासोबत काही चर्चा नाही. एमआयएम भाजपाची बी टीम आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केला.
दानवेंना प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्यासोबत जे नेते चर्चेला बसले होते, त्यांनी सांगितलं आमचे छोटे नेते आहेत त्यांना चर्चेबद्दल सांगू नका. मी कुणासोबत चर्चेला बसलोय हे मला माहिती आहे. कुणासोबत चर्चा झाली हे मला सांगण्याची गरज नाही. परंतु ते नेते अंबादास दानवेंपेक्षा मोठे आहेत हे नक्की, आपली चर्चा कुणालाही सांगू नका, प्राथमिक चर्चा झाल्यावर पुढे बोलू असं संबंधित नेत्यांनी चर्चेवेळी अट घातली होती. मुंबईत ही बैठक झाली. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माहिती घ्यावी, मी मुंबईला गेलो होतो, कुठल्या हॉटेलला थांबलो होतो. मला कोण कोण भेटायला आले होते हे जाणून घ्यावे असा टोला त्यांना लगावला. जलील माध्यमांच्या मुलाखतीत हे बोलले.
तसेच उद्धव ठाकरे विधानसभेला मुस्लीम उमेदवार देणार ही आनंदाची बाब आहे. लोकसभेत त्यांनी एकही उमेदवार दिला नाही. लोकांनी नरेंद्र मोदींविरोधात भाजपाविरोधात जाऊन त्यांना मतदान केले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसलाही ते कळले आहे. तशी परिस्थिती विधानसभेला होणार नाही. त्यामुळे मुस्लिमांची मते घ्यायची असतील तर मुस्लीम उमेदवार द्यावे लागतील हे त्यांना कळाले आहे. फक्त उमेदवारी देऊ नका तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या. चांगला उमेदवार द्या असं आव्हान जलील यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
त्याशिवाय एमआयएमसोबत युती नाही असं अंबादास दानवे बोलतात, परंतु शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं त्यांना अधिकार दिलेले आहेत का? तुमचे नेते उद्धव ठाकरे आहेत त्यांना बोलू द्या. त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगावे, एमआयएमसोबत युती नको, ते किरकोळ आहेत, त्यांची ताकद नाही. मग आमची ताकद आम्ही दाखवू. मुस्लीम मते सगळ्यांना हवीत. शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे, अजित पवार सगळ्यांना मते हवीत. एमआयएमकडून मी महाविकास आघाडीला ऑफर मिडियाच्या माध्यमातून दिला होता. त्यावेळी आम्हाला लेखी प्रस्ताव हवा असं काही नेते म्हणाले, त्यांनीही माध्यमांमधून हे सांगितले असते तर मी लेखी प्रस्तावही पाठवायला तयार आहे. हो किंवा नाही असं थेट सांगा, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका. महाविकास आघाडीचे ३ मोठे नेते आहेत त्यांनी बोलावं, उद्धव ठाकरेंनी सांगावे, अंबादास दानवेंनी जे सांगितले तसं आम्ही एमआयएमला घेणार नाही. तिथे विषय संपतो, शरद पवारांनी सांगावे, आम्हाला एमआयएम चालत नाही असंही जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून आम्ही अर्जवाटप करण्यास सुरुवात करणार आहोत. त्यानंतर इच्छुकांचे अर्ज येण्याच्या तारखेपर्यंत आम्ही थांबू मात्र त्यानंतर आमचे तिकीट वाटप झाले, उमेदवार निश्चित झाले तर काही किंतुपरंतु होणार नाही. महाविकास आघाडीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्ही वाट बघणार नाही आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे असा अल्टिमेटम माजी आमदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
MIM सोबत कुठलीही युती नाही - अंबादास दानवे
महाविकास आघाडीसोबत इम्तियाज जलील यांची चर्चा झाली असेल तर कुणासोबत झाली हे सांगितले पाहिजे. आमच्या शिवसेनेसोबत कुणाची चर्चा होण्याचा प्रश्न नाही. खोटी माहिती समोर आणायची, एमआयएम ही भाजपाची बी टीम म्हणून काम करते. मोठ्या प्रमाणात मुस्लीम मते महाविकास आघाडीसोबत लोकसभेत होते, आता विधानसभेलाही राहतील त्यामुळे या मतदारांना गोंधळात टाकणे, मी मविआसोबत जाण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्यांनी मला घेतले नाही असा प्रयत्न इम्तियाज जलील यांच्या विधानातून वाटतो असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिले आहे.