टाळीचं वांदंं... अन् घशाला कोरड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 04:40 AM2017-02-03T04:40:55+5:302017-02-03T04:40:55+5:30
आजकाल ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टरांची चलती जोरात. कुणी ‘आय स्पेशालिस्ट’ तर कुणी ‘किडनी स्पेशालिस्ट’.. डॉ. ब. सु. सिंहासने हे ‘फॉरेन रिटर्न’ डॉक्टरही ‘खुर्ची स्पेशालिस्ट’.. त्यांच्या हॉस्पिटलवर
- सचिन जवळकोटे
आजकाल ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टरांची चलती जोरात. कुणी ‘आय स्पेशालिस्ट’ तर कुणी ‘किडनी स्पेशालिस्ट’.. डॉ. ब. सु. सिंहासने हे ‘फॉरेन रिटर्न’ डॉक्टरही ‘खुर्ची स्पेशालिस्ट’.. त्यांच्या हॉस्पिटलवर ‘आम्ही फक्त राजकीय नेत्यांचे आजार दूर करतो,’ असा बोर्डही त्यांनी लावून ठेवलेला. आजपावेतो त्यांच्या नावावर शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया जमा झालेल्या. ‘खाऊन-खाऊन अपचन केलेल्या नेत्यांचं पोट’ या डॉक्टरांनी जसं हलकं केलेलं, तसंच ‘सतत घसरणारी जीभही’ म्हणे ताळ्यावर आणून ठेवलेली.
.. असो. सध्या ‘सुगीचे दिवस’ असल्यानं डॉक्टरांचे सारेच राजकीय पेशंट गावभर फिरण्यात दंग होते. त्यामुळं हॉस्पिटल सुनसान होतं. एवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. नंबर व्ही.आय.पी. होता. डॉक्टरांचे डोळे लगेच लकाकले. त्यांनी फोन उचलला.. अन् सुरू झाली पॉलिटिकल आजारांची नवी कहाणी...
तिकडून आवाज : नमस्कार डॉक्टर.. ‘मातोश्री’वरून बोलतोय. आमच्या उद्धो साहेबांच्या हाताचा प्रॉब्लेम झालाय.
डॉक्टर : होऽऽ.. असं होणारच, हे मी त्यांना पूर्वीच सांगितलं होतं. आपला जीव बघून ओझं उचलावं. आजूबाजूची मंडळी सांगतात म्हणून, ‘एकट्यानं अवजड शिवधनुष्य’ उचलण्याचा अचाट प्रयोग करू नये.
तिकडून : अहोऽऽ अहोऽऽ अगोदर नीट ऐकून तरी घ्या. समोरची व्यक्ती मोठ्या कौतुकानं टाळी द्यायला पुढं सरसावली तरीही आमच्या साहेबांना हातच उचलता येईनासं झालंय.
डॉक्टर : (विचार करत) अंऽऽ ? .. मग हा हाताचा नव्हे तर ‘स्वभ्रम’ नावाच्या विचित्र आजाराचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी रोज सकाळी उठल्या-उठल्या आरशासमोर उभारून आपल्या दंडाची बेडकुळी फुगवून पाहण्याचं योगासन करायला हवं.
तिकडून : पाठीचा पण प्रॉब्लेम आहे होऽऽ खूप ठिकाणी जखमांचे व्रण राहिलेत तसेच.
डॉक्टर : आता गेल्या पंचवीस वर्षांपासून पाठीत खंजीर खुपसून घेतलेत, म्हटल्यावर व्रण राहणारच की.. म्हणूनच मी वारंवार सांगत आलोय की, दोन तपं गळ्यात गळे घालून फिरतानाही साथीदाराच्या हातावर बारीक लक्ष ठेवायला हवं होतं.
तिकडून : अजून एक.... गेल्या चार-पाच दिवसांपासून साहेब मुठी आवळूनच इकडं-तिकडं फिरताहेत. कुणीही हसताना दिसलं की मूठ अधिकच आवळताहेत.
डॉक्टर : याला ‘दातांची अॅलर्जी’ म्हणतात. कारण कुत्सित हसताना समोरच्याचे दात दिसले की, पेशंटची ‘वज्रमूठ’ आपोआप आवळली जाते. यावर उपाय एकच.. पेशंटसमोर कुणीही दात काढून हसायचं नाही. बरं मग.. फोन बंद करू का ?
तिकडून : थांबाऽऽ थांबाऽऽ आता शेवटचा एकच प्रॉब्लेम. साहेबांचा आवाज खणखणीत असूनही त्यांना सतत उगाचंच आपला घसा बसल्याचा भ्रम होतोय.
डॉक्टर : (गालातल्या गालात हसत) यावर एकच उपाय. देवेंद्रपंतांचा आवाज न ऐकणं. त्यांच्यासारखा हुबेहूब आवाज काढण्याच्या भानगडीत न पडणं. याशिवाय ‘रोज मूग गिळणं किंवा मुगाचे लाडू खाणं,’ हा घरगुती उपाय केल्यास अधिकच उत्तम...