थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांना टॅक्सीत बसवा
By admin | Published: December 28, 2015 04:23 AM2015-12-28T04:23:28+5:302015-12-28T04:23:28+5:30
नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते.
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई करतानाच बार अॅण्ड रेस्टॉरेंट चालकांनाही यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तळीराम ग्राहकाला टॅक्सी सेवा पुरवण्यात यावी किंवा त्याचे स्वत:चे वाहन असल्यास चालक देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या असून त्यामुळे अपघात होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘तळीराम’चालकांचा बेभान आणि बेधुंदपणा नेहमीच दिसून येतो. त्यांच्या बेभानपणामुळे अपघातांनाही सामोरे जावे लागते. हे पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी तळीरामांना रोखण्यासाठी या वेळी चांगलीच कंबर कसली आहे. जादा वाहतूक पोलिसांची कुमक तैनात करताना पेट्रोलिंग करणाऱ्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये तब्बल ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता, तर १४३ कारचालक होते आणि सहा रिक्षा चालक होते. या तळीराम चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बार अँड रेस्टॉरन्ट चालकांना काही सूचना केल्या आहेत. या बाबत वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे म्हणाले की, ‘नशेत असणाऱ्या ग्राहकाकडे वाहन असल्यास त्याला चालक उपलब्ध करून देण्यात यावा. एखाद्याकडे वाहन नसल्यास टॅक्सीसेवा देण्यात यावी, असे समन्स असणारे पत्र देण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही गुन्हा त्यांच्याकडून घडणार नाही आणि वाहतूक पोलिसांनाही मदत होईल. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगरातील ९0 ठिकाणी नाकाबंदी करतानाच अचानक भेटही देऊन तपासणी करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या कामांसाठी जवळपास दोन हजार वाहतूक पोलीस कार्यरत राहतील.