तळोजा-कल्याण मेट्रो होणार

By admin | Published: May 2, 2017 02:40 AM2017-05-02T02:40:04+5:302017-05-02T02:40:04+5:30

मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना

Taloja-Kalyan Metro will take place | तळोजा-कल्याण मेट्रो होणार

तळोजा-कल्याण मेट्रो होणार

Next

ठाणे : मेट्रो, जलवाहतुकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल. तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रो मार्गाचा अहवाल तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे हा मार्गही मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाण्यासह संपूर्ण एमएमआर प्रदेशात क्लस्टर डेव्हलपमेंट करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सर्वांनी मिळून एक दिवस जरी जलयुक्त शिवारसाठी श्रमदान केले तर जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर होईल आणि ठाणे जिल्ह्यात शेतीला चांगले दिवस येतील. मुंबईला लागून असलेल्या या जिल्ह्याच्या विकासाकडे आधीच्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले असले, तरी आता परिस्थिती बदलली आहे. आपला जिल्हा विविध आघाड्यांवर प्रगती करीत आहे. स्मार्ट शहराच्या यादीत आपली दोन शहरे आली आहेत. तरीही सर्वच शहरे स्मार्ट होतील, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सध्या आपण फक्त भात पिकावर अवलंबून आहोत, आपल्याकडे दोन्ही हंगामात शेती झाली पाहिजे, भाजीपाला लागवडीचे क्षेत्रही वाढविले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठे, प्रगतीशील शेतकरी यांची मदत घेण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पोलीस अधीक्षक महेश पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे तसेच इतर लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उघड्या जीपमधून संचलन पथकाची पाहणी केली. यावेळी विविध पोलीस दले, विद्यार्थी, तसेच विभागांच्या चित्ररथानी संचलन करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, तहसीलदार विकास पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नव्या धरणांची गरज
काही कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये १९ जलयुक्त शिवाराची कामे हाती घेतली आहेत, ही संख्या वाढविली पाहिजे. विशेषत: बंधाऱ्यांची उंची वाढवणे, गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरु स्ती करणे, अशा कामांवर भर देऊन गावे पूर्णत: टंचाईमुक्त कशी होतील याचे नियोजन आम्ही करीत आहोत. जिल्ह्यासाठी एका मोठ्या धरणाची तर आवश्यकता आहेच; परंतु दुसरीकडे पाणी वापराचे काटेकोर नियोजन आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य विकासाचे कौतुक
रोजगार आणि स्वयंरोजगार वाढविण्यासाठी देखील आपण चांगले प्रयत्न करीत आहोत. याचा उल्लेख करून पालकमंत्र्यांनी राज्यातील पहिलेच कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्धल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
च्प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्ज वाटप, हागणदारीमुक्त होण्याकडे केलेली वाटचाल, पेसा कायदा अंमलबजावणी, जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजिटल होणे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत यासारख्या चांगल्या कामगिरीबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिंदे यांचे अभिनंदन केले.

Web Title: Taloja-Kalyan Metro will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.