'तबल्यातील तालयोगी'; उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:30 IST2024-12-16T11:27:34+5:302024-12-16T11:30:54+5:30

Ustad zakir Hussain News in marathi: प्रसिद्ध तबलावादक, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. 

'Talyogini in Tabla'; Raj Thackeray expresses his feelings about Ustad Zakir Hussain | 'तबल्यातील तालयोगी'; उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

'तबल्यातील तालयोगी'; उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Raj Thackeray Ustad Zakir Hussain Latest News: 'उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी' होते असं मला नेहमी वाटत राहिलं', अशा भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर व्यक्त केल्या. 

तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानं संगीत विश्वासह भारतीय हळहळले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबद्दल राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, "जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की  वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी' होते असं मला नेहमी वाटत राहिलं." 

ते बाळकडू पेलवावं झाकीरजींनीच - राज ठाकरे

"असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच", अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या. 

"वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, 'शक्ती' बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली", अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या. 

तबल्याचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल - राज ठाकरे 

"प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल. उस्ताद झाकीर हुसैन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली", अशा शब्दात राज ठाकरेंनी उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली.  

Web Title: 'Talyogini in Tabla'; Raj Thackeray expresses his feelings about Ustad Zakir Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.