कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

By admin | Published: February 28, 2016 02:27 AM2016-02-28T02:27:14+5:302016-02-28T02:27:14+5:30

तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे.

'Tamasha' for children's children's education | कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

Next

- सुदीप गुजराथी, नाशिक
तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे. अनेक होतकरू तरुण-तरुणींना निव्वळ जातीच्या दाखल्याअभावी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतावे लागत असल्याने इच्छा असूनही त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
तमाशा कलावंतांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांमुळे निदान आपली मुले तरी या व्यवसायात पडू नयेत, असे अनेकांना वाटते. हे कलावंत वर्षातले सहा-आठ महिने फिरतीवर असल्याने दौऱ्यातच त्यांची लग्ने जुळतात आणि त्यांना मुलेही होतात. या कलावंतांत जवळपास सगळेच विवाह आंतरजातीय होतात. अनेकांच्या घरातून लग्नाला विरोध असतो. दोघांचे कुटुंबीय हा विवाह स्वीकारत नसल्याने घरातून कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकदा पुरुष विवाहानंतर महिलांना वाऱ्यावर सोडून देतात.
अशा महिला आपल्या मुलांना शाळेत घालताना त्याच्या नावापुढे पतीचे नाव लावतात; मात्र जात स्वत:ची लावतात. या मुला-मुलींना दहावीपर्यंत अडचण जाणवत नाही. महाविद्यालयीन व उच्चस्तरीय शिक्षणात मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य असतो. जातीचा दाखला मिळवण्यासाठी अनुसूचित जाती (एससी) व जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना सन १९४९ पूर्वीचा, भटक्या-विमुक्तांना (एनटी) सन १९६१ पूर्वीचा, तर इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सन १९६७ पूर्वीचा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मतारीख व जातीचा पुरावा आवश्यक असतो. या मुलांच्या पित्याचाच ठावठिकाणा नसल्याने त्यांच्याकडे सध्याची कागदपत्रेही नसतात, तर पन्नास वर्षांपूर्वीची कागदपत्रे कोठून मिळवावीत, असा प्रश्न त्यांना पडतो.
अनेकदा शिक्षणाचे शुल्क
भरण्याची ऐपत नसल्याने तमाशा कलावंतांच्या मुलांवर अर्ध्यावरच
शिक्षण सोडण्याची वेळ येत
आहे. राज्यात तमाशाची १० ते १५ मोठी मंडळे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५-२० लहान पार्ट्या आहेत. या सगळ्या कलावंतांच्या मुलांची हीच व्यथा असून, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी किमान
५० वर्षे पूर्वीच्या पुराव्याची अट तरी रद्द करावी, अशी मागणी होत आहे.

इच्छा असूनही...
सरकार दरबारी हेलपाटे मारल्यावर, जातपडताळणी समितीने गावात येऊन खात्री केल्यानंतर माझ्या मुलांना जातीचा दाखला मिळाला; पण वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशीच तऱ्हा असंख्य कलावंतांच्या मुला-मुलींची आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येतात. सरकारने त्यांच्यासाठी काही अटी शिथिल कराव्यात.
- सोनाली महाडिक, नांदूरशिंगोटे

Web Title: 'Tamasha' for children's children's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.