तांबडा-पांढरा रस्सा ते ‘ग्लोबल कोल्हापूरकर...’
By admin | Published: July 13, 2015 12:00 AM2015-07-13T00:00:00+5:302015-07-13T00:00:00+5:30
‘लोकमत’चा कर्तृत्वाला सलाम : वर्धापनदिनानिमित्त खास विशेषांक; नव्या पिढीला देणार प्रेरणा
कोल्हापूर : ‘जगात भारी कोल्हापुरी..’ असे म्हटले जाते व त्याचा आम्हा कोल्हापूरकरांना अभिमान आणि गर्वही आहे. तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी पायताण, जिभेवर विरघळणारा पिवळाधमक गूळ आणि लहरी फेटा अशी आमच्या कोल्हापूरची देदीप्यमान परंपरा... परंतु, कोल्हापुरी माणूस म्हणजे तेवढेच नाही. त्याची आताची झेप त्यापलीकडेही आहे.
इतिहास असो की वर्तमान; अटकेपार झेंडा लावण्याची रग कोल्हापूरच्या मातीत आणि मनामनांतही कायम आहे. त्याच मातीत जन्माला आलेल्या मर्द मावळ्यांनी असाच भारतभर व जगभरही झेंडा लावला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आणि कोल्हापुरी ‘टॅलेंट’ला सलाम करणारा खास विशेषांक ‘लोकमत’ प्रसिद्ध करीत आहे. निमित्त आहे वर्धापनदिनाचे...!
वर्धापनदिनानिमित्त महत्त्वाच्या विषयावर खास विशेषांक प्रसिद्ध करण्याची ‘लोकमत’ची परंपराच आहे. यापूर्वी सह्याद्रीचा वारसा, कोल्हापुरी कला, कोल्हापुरी राजकारण, असे विशेषांक प्रसिद्ध केले. त्यातील ‘सह्याद्रीचा वारसा’ या विशेषांकाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ‘कोल्हापुरी राजकारण’ या विशेषांकाचे पुस्तकही तयार आहे. केवळ माहिती नव्हे, तर संदर्भमूल्य असलेली ही पुस्तके वाचकप्रिय ठरत आहेत. अशा पार्श्वभूमीवर नवा विशेषांक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
कोल्हापूर हा तसा महाराष्ट्रच नव्हे, तर देशाचा विचार करताही समृद्ध व संपन्न जिल्हा. कधीही दुष्काळाचा सामना करावा न लागलेला. चांगली शेती, तितकेच चांगले सिंचन, तिन्ही ऋतूंतील उत्तम हवामान, सामाजिक स्वास्थ्य चांगले अशी या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्याने अनेक नररत्नांना जन्म दिला आहे. अशी नररत्ने आज महाराष्ट्र, भारत व विदेशांतही आपल्या उत्तुंग कर्तृत्वाचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत. असे असले तरी त्यांची नाळ आजही कोल्हापूरच्या मातीशी घट्ट आहे. अशा व्यक्तिमत्त्वांची जडणघडण नव्या पिढीला समजावी व त्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, हाच हा विशेषांक प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.
तुम्ही फक्त एवढे करा...
येथील मंगळवार पेठेतील चंद्रप्पा पाटील हे रिलायन्स गु्रपचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष आहेत. राजारामपुरीतील जय पाठारे हे जगप्रसिद्ध ‘व्हीआयपी’ गारमेंट कंपनीचे मालक आहेत. शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटच्या सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर मुळे हे आता न्यूयॉर्कमध्ये कौन्सुलेट जनरल आहेत. अशी एक ना अनेक व्यक्तिमत्त्वे ‘कोल्हापूरकर’ म्हणून अभिमानाने या मातीचे नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यांना एकत्र गुंफण्याचाच ‘लोकमत’चा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हांला हवी आहे, तुमची साथ... तुमच्या संबंधित अशा कोणीही व्यक्ती असल्यास त्यांच्यासंबंधीची माहिती, संपर्क नंबर, आदींबाबतची माहिती आम्हांला
मो. : 8975755774 किंवा 9763725244 या क्रमांकांवर अवश्य कळवा. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू व त्यांच्या कार्याचे मोठेपण जगाला सांगू...