तमिळनाडूचा राजेंद्रन ‘स्वयंभू श्री’चा मानकरी

By admin | Published: April 24, 2016 10:15 PM2016-04-24T22:15:29+5:302016-04-24T22:15:29+5:30

तमिळनाडूचा राजेंद्रन मणी रेल्वेच्या किरण पाटीलपेक्षा काकणभर सरस ठरत स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘स्वयंभू श्री’चा मान पटकावला.

Tamilnadu's Rajendran 'Swayambhu Shree' Hon | तमिळनाडूचा राजेंद्रन ‘स्वयंभू श्री’चा मानकरी

तमिळनाडूचा राजेंद्रन ‘स्वयंभू श्री’चा मानकरी

Next

शरीरसौष्ठवाचा क्लासिक थरार : दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंच्या दिव्य पराक्रमाला पुणेकरांचा सलाम
पुणे : तमिळनाडूचा राजेंद्रन मणी रेल्वेच्या किरण पाटीलपेक्षा काकणभर सरस ठरत स्वयंभू फाउंडेशनच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘स्वयंभू श्री’चा मान पटकावला. इंडियन बॉडिबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सहकार्याने हनुमान जयंतीचे औचित्य साधत सणस मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून ३० शरीरसौष्ठवपटूंना निमंत्रित करण्यात आले होते. सर्वच खेळाडू अव्वल असल्यामुळे टॉप टेन फार चुरशीची झाली. ‘स्वयंभू श्री’ कोण ठरणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली होती. जेतेपदाच्या शर्यतीत किरण पाटील, राजेंद्रन आणि यतिंदरमध्येच खरी चुरस होती. जेव्हा ‘टॉप थ्री’चा निकाल जाहीर केला जात होता तेव्हा या तिघांचे चेहरे पाहण्यासारखे होते. २०१३ मध्ये हंगेरी येथे झालेल्या मि. वर्ल्डमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर गेली दोन वर्षे विश्रांती करणाऱ्या राजेंद्रनने जबरदस्त कमबॅक केले. त्याने रेल्वेच्या किरण पाटीलवर मात करीत ‘स्वयंभू श्री’वर आपल्या नावाची मोहोर उमटवली. विक्रमी पुरस्कार रकमेच्या या स्पर्धेत महाराष्ट्राचा महेंद्र चव्हाण सातवा आला. राजेंद्रनने या किताबाबरोबर पटकावले सहा लाखांचे विक्रमी इनाम. तसेच, पुणेकरांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या दिव्यांग ‘स्वयंभू श्री’ स्पर्धेत विजेता ठरलेला मध्य प्रदेशचा दीपंकर सरकार प्रथमच लखपती बनला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ खासदार अनिल शिरोळे, फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे, विश्वस्त रणजित कागदे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, आयबीबीएफचे अध्यक्ष प्रेमचंद डोगरा, सरचिटणीस चेतन पाठारे, राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. विक्रम रोठे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष वरुण श्रीनिवासन, सरचिटणीस शरद मारणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत मुख्य गटात अव्वल पाच खेळाडू लखपती ठरले. तसेच, टॉप टेनबाहेर फेकल्या गेलेल्या २० खेळाडूंना प्रत्येकी २० हजारांचे उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन स्वयंभू फाउंडेशनने गौरविले. ‘स्वयंभू श्री’ मध्ये एकंदर २४ लाखांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली.
चौकट :
दिव्यांग शरीरसौष्ठवाला मानाचा मुजरा
भारताच्या दहा राज्यांमधून आलेल्या १४ दिव्यांग शरीरसौष्ठपटूंचे आगमन मंचावर होताच उपस्थित चाहत्यांनी उभे राहून मानवंदना दिली. अशा दिव्यांग खेळाडूंची पीळदार देहयष्टी पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एकाच वेळी मंचावर चौदाही खेळाडू आले. यात कुणाचा एक पाय स्टील रॉडचा होता, तर एकाने कृत्रिम पाय बसवला होता. चार खेळाडूंचे तर दोन्ही पाय पोलिओग्रस्त होते. काहींचे एक पाय पूर्णपणे पोलिओचे बळी ठरले होते, तर एकाच्या दोन्ही पायांच्या गुडघ्याला वाटीच नव्हती. अशा खेळाडूंच्या जिगरबाज वृत्तीला पुणेकरांनी भरभरून दाद दिली. इथे आलेले सारेच विजेते होते. पायांची साथ नसतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पीळदार देहासाठी या दिव्यांग खेळाडूंनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद होती. या स्पर्धेतही बाजी मारली ती दिव्यांग गटाचा मि. इंडिया ठरलेल्या दीपंकर सरकारने. त्यानेच लाखमोलाच्या दिव्यांग ‘स्वयंभू श्री’चा मान मिळविला. बंगालचा गोपाल साहा दुसरा आला. महाराष्ट्राचे इंद्रप्रकाश राव आणि सागर चौहान क्रमशा चौथे आणि पाचवे आले.
निकाल :
‘स्वयंभू श्री’ २०१६ चा टॉप टेन निकाल
राजेंद्रन एम. (तमिळनाडू), किरण पाटील (रेल्वे), यतिंदर सिंग (उत्तर प्रदेश), जगदीश लाड (महाराष्ट्र), बी. महेश्वरन (सेनादल), एन. सरबो सिंग (रेल्वे), महेंद्र चव्हाण (महाराष्ट्र), बोरून यमनम (रेल्वे), लवीन के. (रेल्वे), विनीत शर्मा (पंजाब).
दिव्यांग ‘स्वयंभू श्री’चे टॉप फाइव्ह
दीपंकर सरकार (मध्य प्रदेश), गोपाल साहा (प. बंगाल), बिक्रमजित सिंग (पंजाब), इंद्रप्रकाश राव (महाराष्ट्र), चौहान (महाराष्ट्र). (क्रीडा प्रतिनिधी)
=====================

====================

 

Web Title: Tamilnadu's Rajendran 'Swayambhu Shree' Hon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.