तानाजी चित्रपट करमुक्त करावा; सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 18:08 IST2020-01-12T18:06:32+5:302020-01-12T18:08:04+5:30
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्ठ मित्र आणि वीर निष्ठावान मराठा सरदार होते.

तानाजी चित्रपट करमुक्त करावा; सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारकडे मागणी
चंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत तानाजी या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्ठ मित्र आणि वीर निष्ठावान मराठा सरदार होते. तानाजी सारख्या वीर योद्ध्याच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत युध्दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्या श्रेष्ठ मराठी संस्कृतीचा मानबिंदु आहेत.
या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्त करुन शासनाने या वीर योध्द्याला मानवंदना, द्यावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.