टंडन रस्त्यावर अराजक!

By admin | Published: August 25, 2016 03:42 AM2016-08-25T03:42:31+5:302016-08-25T03:42:31+5:30

वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या टंडन रस्त्यावर दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अराजकासारखी स्थिती निर्माण झाली

Tandon street chaotic! | टंडन रस्त्यावर अराजक!

टंडन रस्त्यावर अराजक!

Next


डोंबिवली : डोंबिवलीचा पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या पुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या टंडन रस्त्यावर दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अराजकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गर्दीचा कालावधी ठावूक असूनही वाहतुकीचे नियोजन न केल्याचा फटका बस प्रवासी, स्कूल बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी, सर्व वाहनचालकांसह पादचाऱ्यांना बसतो आहे. त्यातच आता या रस्त्यावर गणेशोत्सवानिमित्त कमानी उभारण्याचे काम सुरू असल्याने उत्सवाच्या काळात या अराजकात भर पडण्याची चिन्हे आहेत.
वाहतुकीचे कोणतेही नियोजन नाही. वाहनचालकांना शिस्त नाही. लेनची आखणी नाही आणि लेन पाळण्याचा, काही काळ कोंडी झाल्यास लेन न तोडण्याइतका संयम नाही. त्यातही रिक्षा, दुचाकी आणि छोट्या चार चाकी वाहनांमुळे दररोज सकाळी दीड ते दोन तास आणि संध्याकाळी किमान चार तास कोंडी होते. थेट पदपथावरून वाहने नेली जातात. कोंडी होते हे ठावूक असूनही टंडन रस्त्यावर म्हाळगी चौक, पुजारी चौक येथे वळणावरच पार्किंग होते. मंडप डेकोरेटर्स, ड्रायव्हिंग स्कूलची वाहने रस्त्यातच पार्क केलेली असतात. तेथील एका हॉलचे पार्किंग रस्त्यातच होते. भोवतालच्या इमारतींतील पार्किंग रस्त्यावर असते. शिवाय वापरात नसलेल्या-भंगारातील गाड्याही या कोंडीत भर घालत असतात. मात्र वाहतूक विभाग, पालिका यांतील कोणीच जबाबदारी घेत नसल्याने दररोज हजारो वाहनचालक, पादचारी, आसपासचे रहिवासी या कोंडीने त्रस्त झाले आहेत. धूर, धूळ, हॉर्नचे आवाज यामुळे हा परिसर चालण्यासही नकोसा बनला आहे. (प्रतिनिधी)
>बेकायदा वाहनतळ
या कोंडीचा फायदा घेत आणि वडारवाडी पट्ट्यात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे राजेंद्रप्रसाद रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहनतळ झाला आहे. दोन्ही बाजुला पार्किंग असूनही प्रसंगी डबल पार्किंग केले जाते. त्यामुळे तेथून चालणेही कठीण झाले आहे. त्यातील काही वाहनांना विठ्ठल मंदीर रस्त्याचा पर्याय खुला करून दिला, तर कोंडी सहज कमी होऊ शकते.
>वाहतूक वळवण्याकडे दुर्लक्ष
डोंबिवली पश्चिमेतून येणारी वाहने टंडन रस्त्यावर न आणता ती केळकर रोडवरून शिवमंदिर रस्त्यातून वळवली, त्यांना टाटा पॉवर लाइनचा पर्याय दिला तर कोंडीवर बराच दिलासा मिळू शकतो. शिवमंदिर चौक आणि चार रस्त्यातील कोंडीही कमी होऊ शकते. रहिवाशांनी हा पर्याय सुचवूनही वाहतूक विभाग-पालिकेचे अधिकारी हातावर हात धरून बसले आहेत. यातही टाटा पॉवर लाइनचा निम्मा रस्ता बेकायदा पार्किंग, दुकानांच्या अतिक्रमणाने व्यापला आहे. पण त्यावर कारवाईस कोणीही तयार नाही.
>नैसर्गिक विधीचा प्रश्न
स्कूल बस तासनतास खोळंबत असल्याने त्यात बसलेल्या मुलांचा-खास करून मुलींच्या नैसर्गिक विधीचा प्रश्न आहे. शिवाय क्रांतीतीनगर झोपडपट्टीतील रहिवासीही रस्ता ओलांडून पुसाळकर उद्यानातील स्वच्छतागृहात येतात. तेही खोळंबलेले असतात.
कचराकुंडीमुळेही कोंडी
पुसाळकर उद्यानाला लागून कचराकुंडी आहे. झोपडपट्टी आणि हॉटेलमालकांच्या दबावामुळे भर गर्दीच्या रस्त्यात ही कुंडी आहे. त्यातील कचरा ओसंडून रस्त्यात पसरतो. त्यामागे मोकळी जागा आहे. ती कुंडी तेथून हलवायची नसल्यास आहे त्याच जागी मागे पदपथावर नेल्यास रस्ता आणखी मोकळा होऊ शकतो. शिवाय त्या कुंडीसमोरच गाड्यांची दुरूस्ती, हॉटेल यामुळे बेकायदा पार्किंग आहे. ते हटवल्यासही दिलासा मिळू शकतो.
>ज्येष्ठांना जीवाची धास्ती : पालिकेचे आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने पुसाळकर उद्यानात दिवसभर प्रेमीयुगुलांचे चाळे सुरू असतात. तरीही काही ज्येष्ठ सकाळी, संध्याकाळी तेथे फेरफटका मारण्यास जातात. मात्र वाहनांच्या गर्दीमुळे त्यांना रस्ता ओलांडता येत नाही. जीव मुठीत धरून कशीबशी वाट काढावी लागते.
>पुलालगत पार्किंग
केळकर रस्त्यावर जेथे उड्डाणपूल सुरू होतो, तेथेर्बिर्याणी कॉर्नरलगत वाहन दुरूस्ती, दुचाकींची उपकरणे मिळणारी दुकाने आहेत. तेथे कशीही वाहने लावलेली असतात. त्यांनी शिस्त लावली, तरी कोंडी कमी होण्यास मदत मिळेल, मात्र पालिका-पोलिसांचे त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते आहे.
>भरचौकात भाजी मार्केट
आधीच कोंडीमुळे शिवमंदिर चौैकात वाहने खोळंबलेली असताना त्या चौकात तीन दिशांना बेकायदा भाजी मार्केट सुरू आहे. त्या भाजीवाल्यांना टाटा पॉवर लाइन परिसरात हलवले तर मार्केटही सुरू राहील आणि कोंडीचा प्रश्नही मार्गी लागेल. तेथील बेकायदा पार्किंग हटवता येईल.
>रस्ता रुंदीकरण गरजेचे
टंडन रस्त्याचे रूंदीकरण होण्याची गरज आहे. त्यासाठी तेथे दुतर्फा जागा आहे. मात्र इमारत मालकांनी ती अडवली आहे. नवी बांधकामे होतानाच रस्त्यासाठी मोकळी जागा सोडूनही तिचा ताबा पालिकेने न घेतल्याने रस्ता अरूंद आणि इमारतींच्या परिसरात मोकळी जागा असे विचित्र चित्र आहे.

Web Title: Tandon street chaotic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.