तान्हुलीला दूध पाजताना काळाने घातला घाला
By Admin | Published: July 13, 2017 02:03 AM2017-07-13T02:03:08+5:302017-07-13T02:03:08+5:30
तान्ह्या बाळाला दूध पाजताना एका आदिवासी महिलेला सर्पाने दंश केला.
गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तान्ह्या बाळाला दूध पाजताना एका आदिवासी महिलेला सर्पाने दंश केला. मंगळवारी दुपारी हा प्रकार आरे कॉलनीत घडला. मात्र, रुग्णालयाअभावी वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याने, या परिसरात संतापाचे वातावरण आहे. यशोदा रमेश कडू (१९) असे या मयत आदिवासी महिलेचे नाव आहे.
यशोदा या गोरेगाव पूर्व परिसरात आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक २९ मध्ये राहत होत्या. स्थानिक रहिवासी असलेल्या समाजसेविका पूनम गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यशोदा या दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाला (मुलीला) दूध पाजत होत्या. त्या वेळी त्यांच्या पाठीला सापाने एकदा नव्हे, तर तीन वेळा दंश केला. मात्र, तेव्हा त्यांना ते समजले नाही. काही वेळाने त्यांच्या पाठीला वेदना जाणवू लागल्या. तेव्हा त्यांनी शेजारी जाऊन याबाबत सांगितले. शेजाऱ्यांनीच त्यांना सापाने दंश केल्याचे सांगितले, तसेच डॉक्टरकडे नेण्यासाठी पळापळ सुरू केली. मात्र, आरेमध्ये जवळपास कुठेही रुग्णालय नसल्याने, त्यांना आणि बाळाला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले.
दोन महिन्यांपूर्वी गायकवाड यांच्या मुलाचा कुत्र्याने चावा घेतला, तेव्हादेखील रुग्णालयाअभावी ट्रॉमा केअर आणि नंतर कूपर रुग्णालयात त्यांच्या मुलाला हलवावे लागले, ज्यामुळे त्याची स्थितीही गंभीर झाली होती. मंगळवारी उशिरा रात्री यशोदा यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला, ज्यावर आरे चेकनाका परिसरात असलेल्या स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यशोदा आणि तिचा नवरा अनाथ असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यातच या घटनेने सात महिन्यांच्या तान्हुलीची मायेची सावलीदेखील कायमची हिरावून घेतली. विज्ञान आणि मेडिकल इतके प्रगत असतानाही, मुंबईसारख्या शहरात साप चावून व्यक्ती मरावी, ही शोकांतिका आहे.
मात्र, आदिवासींच्या हक्कांसाठी अजूनही स्थानिक नेत्यांकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. एकंदर या घटनेमुळे आरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
>बाळाची मृत्यूशी झुंज?
यशोदा यांना साप चावला, तेव्हा त्या बाळाला दूध पाजत होत्या. त्यामुळे बाळालाही विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच कारणास्तव त्याला चोवीस तासांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
घराशेजारीच सापाचे बीळ!
यशोदा यांना सापाने चावल्याचे समजताच, स्थानिकांनी सापाला सर्वत्र शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सर्पमित्रालादेखील बोलाविण्यात आले. त्याने सापाला शोधून बाहेर काढले.
यशोदा यांच्या घराशेजारीच त्या सापाचे बीळ त्यांना सापडले. या घटनेमुळे इतकी चीड स्थानिकांच्या मनात होती की, सापाला बाहेर काढून घेऊन जाणाऱ्या सर्पमित्राला स्थानिकांनी अडविले. त्यानंतर, त्याच्याकडचा साप खेचून घेऊन त्याला ठेचून मारले.
आरे रुग्णालयात सुविधांचा अभाव
आरेमध्ये युनिट क्रमांक १६ जवळ ‘आरे रुग्णालय’ नावाचे इस्पितळ उघडण्यात आले आहे. मात्र, त्यात योग्य सुविधा उपलब्ध नाहीत, तसेच सर्पदंश किंवा कुत्र्याने चावा घेतल्यास आवश्यक असलेली इंजेक्शन्सदेखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयाशिवाय स्थानिकांकडे दुसरा पर्यायच नाही.